शिवाजी पार्कवरील पार्किंगसाठी पर्यायी जागा का शोधली नाही? - हायकोर्ट
By admin | Published: September 1, 2016 05:44 AM2016-09-01T05:44:49+5:302016-09-01T05:44:49+5:30
गणेश विसर्जनादरम्यान शिवाजी पार्कवरील पार्किंगसाठी पर्यायी जागा शोधण्याचा आदेश पाच वर्षांपूर्वी देऊनही अद्याप पर्यायी जागा का शोधण्यात आली नाही?
मुंबई : गणेश विसर्जनादरम्यान शिवाजी पार्कवरील पार्किंगसाठी पर्यायी जागा शोधण्याचा आदेश पाच वर्षांपूर्वी देऊनही अद्याप पर्यायी जागा का शोधण्यात आली नाही? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला एका आठवड्यात पर्यायी जागा शोधण्यासाठी समिती नेमण्याचा आदेश दिला. किती कालावधीत जागा शोधण्यात येईल, या संदर्भात हमीपत्र द्या, तरच शिवाजी पार्कवर गणेश विसर्जनाच्या वेळी पार्किंगला परवानगी देऊ, असेही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले.
गणेशविसर्जनाच्या दिवशी म्हणजे पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी शिवाजी पार्कवर पार्किंग करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात नोटीस आॅफ मोशन दाखल केले. या मोशनवर न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.
सरकारच्या मोशनवर विकॉम ट्रस्टने आक्षेप घेतला. ‘पार्किंगमुळे मैदान खराब होते आणि पाच वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने शिवाजी पार्कवरील पार्किंगसाठी पर्यायी जागा शोधण्याचा आदेश राज्य सरकारला दिले होते. जागा शोधण्यासाठी समिती नेमण्याचाही आदेश दिला होता.
मात्र, अद्याप समिती नेमण्यात
आली आहे आणि सरकार तशीच चालढकल करत पाच वर्षे सवलत
घेत आहे,’ असे विकॉमने खंडपीठाला सांगितले.
‘गेली पाच वर्षे तुम्ही (राज्य सरकार) केवळ आश्वासन देऊन न्यायालयाकडून पार्किंगसाठी परवानगी घेत आहात. अद्याप समिती का नेमण्यात आली नाही? हे दरवर्षीच घडत राहील,’ असे म्हणत खंडपीठाने एका आठवड्यात समिती नेमण्याचा आदेश दिला.
ही समिती किती दिवसांत शिवाजी पार्कवरील पार्किंगसाठी पर्यायी जागा शोधेल, हेही आम्हाला सांगा, तसे हमीपत्र द्या. हमीपत्र दिले नाहीत, तर आम्ही यंदा शिवाजी पार्कवर पार्किंग करण्यास परवानगी देणार नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १ सप्टेंबर रोजी ठेवली
आहे. (प्रतिनिधी)