सर्व मॅनहोल्सना संरक्षक जाळ्या का लावत नाहीत? हायकोर्टाची महापालिकेला विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 05:51 AM2023-06-15T05:51:52+5:302023-06-15T05:52:25+5:30
१९ जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी मुंबईतील सर्व मॅनहोल्सला संरक्षक जाळ्या का लावत नाही? अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने याबाबत महापालिकेला १९ जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला आहे. २०१८ मध्ये उच्च न्यायालयाने मॅनहोल्स उघडे राहू नयेत यासाठी काही यंत्रणा विकसित करावी असे सांगितले होते. सर्व तेव्हाही सर्व मॅनहोल्सना संरक्षक जाळ्या बसविण्यासही सांगितले, मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये पालिकेने १० टक्क्यांपेक्षा कमी मॅनहोल्सना संरक्षक जाळी बसविली आहे, अशी टिपण्णी प्रभारी मुख्य न्या. नितीन जामदार व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने केली.
शहरातील खराब रस्ते व उघड्या मॅनहोल्ससंदर्भात व्यवसायाने वकील असलेल्या रुजू ठक्कर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २०१८ मध्ये या याचिकेवर पालिकेला वेगवेगळे निर्देश देण्यात आले. तरीही मुंबईतील काही ठिकाणी रस्त्यांची स्थिती खराब आहे, तर काही ठिकाणी उघडी मॅनहोल्स असल्याने रुजू यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.
याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हे आदेश पालिकेला दिले.
आयुक्तांकडून सूचना घेऊ..
याबाबत पालिका आयुक्तांना माहिती देऊन त्यांच्याकडून सूचना घ्यावी लागेल, असे साखरे यांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने पालिकेला याबाबत सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
अंदाज चुकू शकतो...
महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी खंडपीठाला सांगितले की, पूरसदृश ठिकाणी असलेल्या मॅनहोल्सना जाळ्या बसविल्या आहेत. कारण त्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये. यावर ‘केवळ पूरसदृश ठिकाणीच का? संपूर्ण शहरात का नाही? तुमचा अंदाज चुकू शकतो. २०१७ मध्ये मॅनहोल्समध्ये पडून एकाचा (बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दीपक अमरापूरकर) मृत्यू झाला. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शहरातील सर्व मॅनहोल्सना संरक्षक जाळ्या लावा,’ असे न्यायालयाने बजावले.
‘पावसाळ्यात मॅनहोल उघडे राहणार नाही, याची खात्री करा’
थेट उच्च न्यालयाकडून विचारणा झाल्यानंतर मुंबई पालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, १९ जूनपूर्वी आपापल्या विभाग, कार्यक्षेत्रातील मॅनहोलचे सर्वेक्षण करावे, तसेच एकही मॅनहोल खुले/ उघडे राहणार नाही, याची खात्री करावी, अशा सूचना आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिल्या आहेत. या मुदतीनंतर यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, असे आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईत एक लाखांहून अधिक मॅनहोल असून, यात पर्जन्य वाहिनी विभागाच्या अखत्यारीत २५ हजार ६००, तर मलनिस्सारण विभागाच्या अखत्यारीत ७४,६८२ मॅनहोल आहेत.