देशात OBC आरक्षण असताना राज्यात का नाही? - फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 07:57 AM2021-06-27T07:57:58+5:302021-06-27T07:58:30+5:30
मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूरसह सर्व जिल्ह्यांत कार्यकर्त्यांचा एल्गार
मुंबई : देशाच्या प्रत्येक राज्यात ओबीसींचे आरक्षण असताना महाराष्ट्रातच का नाही, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूर येथे केला. राज्य सरकारने ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी वेळकाढूपणा केला. १५ महिने राज्य सरकारने न्यायालयात अॅफिडेव्हिटच सादर केले नाही. सात वेळा तारखा घेण्यात आल्या. त्यामुळे देशात महाराष्ट्रात ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले, अशी टीका त्यांनी केली.
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने शनिवारी औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, अकोला, चंद्रपूर, अमरावती, नवी मुंबईसह राज्याच्या सर्व जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. नागपुरात व्हेरायटी चौकात फडणवीस यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यावेळी फडणवीस यांच्यासह खासदार डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.
मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात मुंबईतील विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले गेले. प्रदेश भाजप कार्यालय नरीमन पॉइंट, मुलुंड आणि दहिसर चेकनाका येथे कार्यकर्त्यांनी चक्का जाम करून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने करीत अटक करवून घेतली. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.