ब्रेक घेत का होईना; पावसाने मुंबईला धुतले !
By सचिन लुंगसे | Published: July 13, 2024 08:01 PM2024-07-13T20:01:21+5:302024-07-13T20:01:43+5:30
Mumbai Rain Update: मुंबईकरांचा शनिवार उजाडला तोच मुसळधार सरींनी; भल्या पहाटे काळोख केलेल्या पावसाने दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरात अक्षरश: धुवाँधार बरसात केली. विशेषत: ब्रेक घेत का होईना दाखल होणा-या पावसाच्या मोठया सरींमुळे मुंबईकरांची तारांबळ उडत होती.
मुंबई - मुंबईकरांचा शनिवार उजाडला तोच मुसळधार सरींनी; भल्या पहाटे काळोख केलेल्या पावसाने दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरात अक्षरश: धुवाँधार बरसात केली. विशेषत: ब्रेक घेत का होईना दाखल होणा-या पावसाच्या मोठया सरींमुळे मुंबईकरांची तारांबळ उडत होती. शहरात मात्र पाऊस कमी असला तरी सोसाटयाचा वारा आणि पाऊस अशा दोन्ही वातावरणाने मुंबई बेजार झाली होती.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने शनिवारी सकाळीच मुंबईकरांना ऑरेंज अलर्ट दिला आणि कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. शुक्रवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत पडणा-या पावसामुळे शनिवारी सकाळीच मुंबई ठप्प होईल, अशी भीती असतानाच मधल्या काळात पावसाने विश्रांती घेतली. मात्र शनिवारी सकाळपासून थांबून थांबून पाऊस कोसळत होता. पंधरा एक मिनिट पडणा-या पावसाच्या मोठया सरींमुळे मुंबईकरांची धावपळ होत होती. कार्यालयीन कर्मचा-यांना शनिवारमुळे अर्धा दिवस असला तरी लोकलला इतर प्रवाशांची गर्दी कायम होती. लोकल नेहमीप्रमाणे दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यात पाऊस लोकल प्रवाशांनाही झोडपून काढत होता. सकाळपासून दुपारपर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरात सर्वसाधारणपणे हीच अवस्था होती.
गेल्या काही दिवसांपासून सर्वसाधारणरित्या पाऊस आणि ऊनं असे काहीसे वातावरण मुंबईत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून दाटून येणा-या ढगांची मुंबईकरांनी धास्ती घेतली आहे. कारण हे ढग कायम पाऊस पाडत नसले तरी अधून-मधून मोठा पाऊस घेऊन येत आहेत.
- सकाळ आणि दुपारच्या सत्रात विद्यार्थी आणि पालकांचे पावसामुळे मोठे हाल झाले.
- पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर पाणी साचले नसले तरी वाहतूकीचा वेग धीमा होता.
- कुर्ला अंधेरी रोडवर वाहणा-या पावसाच्या पाण्याने दुचाकी आणि रिक्षा चालकांना अडथळे निर्माण होत होते.
- मुंबई व ठाण्याला जोडणा-या लाल बहादूर शास्त्री मार्गावर पावसाचे पाणी साचले नसले तरी वाहतूक धीम्या मार्गाने धावत होती.
पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला. वाहतूकीचा मार्ग अंधेरी सबवे पूर्व गोखले रोडकडे व अंधेरी सबवे पश्चिम एस.व्हि रोड मार्गे गोखले रोडकडे वळविण्यात आला.
काळा किल्ला आगार अभियांत्रिक विभाग येथे इमारतीचा सज्जा कोसळून मनुष्यहानी टळली. याकडे लक्ष गरजेचे आहे. सज्जाचे पाडकाम करून तातडीने काढून टाकण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिली.
कोस्टल रोड डाऊन दिशेत ब्रीच कँडी रुग्णालय ते मरीन ड्राइव्ह पर्यंत डागडुगीकरीता सर्व वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. या कारणास्तव नवीन बसमार्ग ७८ च्या बसगाड्या मरीन ड्राइव्ह - डाऊन येथून पहिल्या बसपासून बसमार्ग १२३ प्रमाणे एन. एस. रोड ने विल्सन कॉलेज, उजवे वळण घेत बाबूलनाथ मंदिर, डावे वळण घेत केम्स कॉर्नर (उड्डाणपूल खाली) पुन्हा डावे वळण घेत बसमार्ग ७७ प्रमाणे मुकेश चौक ते ब्रीच कँडी रुग्णालय व तेथून पुढे नेहमीच्या मार्गाने धावत होत्या.
- कारच्या बिघाडामुळे जे. जे ब्रिज दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती.
- बीएमसीच्या कामामुळे खंबाला हिल उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती.
- मिक्सरच्या बिघाडामुळे सावित्रीबाई फुले जंक्शन, लिंक रोड घाटकोपर येथे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती.
- ऑटो रिक्षाच्या बिघाडामुळे आरे ब्रिज दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने होती.
- टॅक्सी अपघातामुळे तुळपुळे पुल, माटुंगा दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने होती.