Join us

नियम मोडणाऱ्या राजकीय पक्षांवर कारवाई का नाही?- उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 4:50 AM

ध्वनिप्रदूषणाबाबत पोलिसांकडून मागितले स्पष्टीकरण

मुंबई : गणेश विसर्जनावेळी गिरगाव चौपाटी येथे काही राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेली सार्वजनिक मंडळे रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांच्या उपस्थित लाऊडस्पीकर ढोल, ताशे व बेंजो वाजवत होती. मात्र, या मंडळांवर काहीच कारवाई न केल्याने उच्च न्यायालयाने पोलिसांना चांगलेच फटकारले आणि संबंधित राजकीय पक्षांवर कारवाई का केली नाही, याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून बुधवारी मागितले.रात्री दहानंतर लाऊडस्पीकरचा वापर करण्यास बंदी असल्याने काही सार्वजनिक मंडळांनी गणेश विसर्जनादरम्यान लाऊडस्पीकर बंद केले व वाद्ये वाजविणेही बंद केले. मात्र, राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिसांच्या उपस्थितीत रात्री एक वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावून ढोल, ताशे व बेंजो वाजविल्याची माहिती आवाज फाउंडेशनने न्या. अभय ओक व न्या. महेश सोनक यांच्या खंडपीठाला बुधवारी दिली.सणाच्या काळात ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने याविरोधात आवाज फाउंडेशन, ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर आणि आणखी काही लोकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी २४ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.‘यंदा ध्वनिप्रदूषण कमी’यंदा डीजेवर बंदी घातल्याने गणेश विसर्जनावेळी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ध्वनीप्रदूषणात घट झाल्याचेही आवाज फाउंडेशनने मान्य केले. तरीही मुंबई,पुणे व नाशिक येथे पारंपारिक वाद्यांनी ध्वनीप्रदूषणाची कमाल पातळी ओलांडल्याचेही आवाज फाउंडेशनने न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :प्रदूषणराजकारणमुंबई हायकोर्ट