Join us

रमेश कदम यांच्यावर कारवाई का नाही? हायकोर्टाची कारागृह प्रशासनाला विचारणा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 4:48 AM

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपी रमेश कदम हे कारागृहात गटबाजी करून कैद्यांना कारागृह प्रशासनाविरुद्ध भडकवत असल्याचे सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एका अहवालात म्हटले आहे.

मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपी रमेश कदम हे कारागृहात गटबाजी करून कैद्यांना कारागृह प्रशासनाविरुद्ध भडकवत असल्याचे सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एका अहवालात म्हटले आहे. त्याचा आधार घेत उच्च न्यायालयाने रमेश कदम यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश कारागृह प्रशासनाला दिला होता. मात्र अद्याप कारवाई न करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने याबाबत कारागृह प्रशासनाला जाब विचारत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.जनआंदोलन या एनजीओने राज्यातील कारागृहांच्या स्थितीबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने आर्थर रोड कारागृहाची पाहणी करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांना दिले. ही पाहणी करत असताना न्यायाधीशांनी रमेश कदम कारागृहात गटबाजी करत असून, कैद्यांना कारागृह प्रशासनाविरुद्ध भडकवत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्याचा उल्लेख अहवालात केला. याचा आधार घेत एनजीओच्या वतीने अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी ही बाब न्या. अभय ओक व न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली.‘गेल्या सुनावणीत तुम्हाला संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यास सांगितले होते. मग कारवाई का केली नाहीत,’ असा प्रश्न न्यायालयाने कारागृह प्रशासनाला केला.अधिकारी एवढे हतबल आहेत का की ते कारवाई करू शकत नाहीत? अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यावर कारागृह प्रशासनाने रमेश कदम अंडर ट्रायल असल्याने त्याच्यावर कारवाई करू शकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले.सुनावणी तहकूब‘सत्र न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब का आणण्यात आली नाही? तुमचे हे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्रावर येऊ द्या,’ असे म्हणत, न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली. 

टॅग्स :गुन्हामुंबई हायकोर्ट