Join us

ठाकरे गटातील नेत्यांची सुरक्षा का कमी केली?, खासदार राजन विचारे यांची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 8:09 AM

एकनाथ शिंदे गटातील खासगी सचिवांना आणि कार्यकर्त्यांना तसेच ज्यांना कोणतेही पद देण्यात आलेले नाही, मात्र शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत त्यांना सरकारी तिजोरीतून खर्च करून सुरक्षा पुरविण्यात येत आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे असल्याने आपली सुरक्षा कमी करण्यात आल्याचे सांगत ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली आहे. विचारे यांची सुरक्षा कमी करून त्यांच्या सुरक्षेसाठी केवळ एक हवालदार तैनात करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गटातील खासगी सचिवांना आणि कार्यकर्त्यांना तसेच ज्यांना कोणतेही पद देण्यात आलेले नाही, मात्र शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत त्यांना सरकारी तिजोरीतून खर्च करून सुरक्षा पुरविण्यात येत आहे. मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे, असे विचारेंनी   याचिकेत म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकार करत आहे. खासदार-आमदार यांना धमकावण्याइतपत त्यांची मजल पोहोचली आहे. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणाऱ्यांची गळचेपी करण्यासाठी सरकार संपूर्ण सरकारी यंत्रणेचा वापर करत आहे. त्यामुळे आपल्याला व आपल्या कुटुंबाला धोका असल्याची भीती विचारे यांनी याचिकेद्वारे व्यक्त केली आहे.

टॅग्स :न्यायालयमुंबई