"एवढ्या 'सिरीयस'पणे विद्यार्थ्यांची लुट का?, एकच परीक्षा, पण फी वेगवेगळी"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 05:18 PM2023-08-08T17:18:08+5:302023-08-08T17:19:28+5:30
तलाठी भरतीसाठी उमेदवारांना १००० रुपये फी ठेवण्यात आली आहे. तर, मागास प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये भरावे लागतात.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मेगा भरतीसाठीच्या फीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना विद्यार्थ्यांना १ हजार रुपये फी ठेवल्याचं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. उमेदवारांना परीक्षेचा सिरीयसनेस असावा म्हणून आपण १ हजार रुपये फी आकारत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आता पुन्हा एकदा आमदार पवार यांनी सहकार विभागातील भरतीप्रकियेतीली फीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
तलाठी भरतीसाठी उमेदवारांना १००० रुपये फी ठेवण्यात आली आहे. तर, मागास प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये भरावे लागतात. या भरती प्रकियेतून संबंधित कंपनींना तब्बल १३५ ते १४० कोटी रुपयांचा महसुल गोळा झाला आहे. त्यामुळे, ही विद्यार्थ्यांची लूट नाही का, असा सवाल करत रोहित पवार यांनी राज्य सरकारला आरसा दाखवला होता. त्यावेळी, वेळ मारुन नेण्याचं काम उपमुख्यमंत्र्यांनी केलं. आता, सहकार विभागातील पदांसाठी भरती निघाली असून या दोन पदांसाठी एकत्र आणि एकच परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, दोन पदांसाठी वेगवेगळी फी आकारण्यात येत असल्याकडे आमदार पवार यांनी लक्ष्य वेधलं.
सहकार विभागाच्या दोन वेगवेगळ्या पदांसाठी एकच आणि एकत्र परीक्षा घेतली जाणार असेल तर मग
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 8, 2023
दोन पदांसाठी वेगवेगळी फी का ?
१००० रुपये ऐवजी २००० रुपये का ?
एवढ्या #serious पणे विद्यार्थ्यांची लुट का ? आणि कोणासाठी?@Dev_Fadnavispic.twitter.com/mJEUxZXoG5
रोहित पवार यांनी पुन्हा एकदा परीक्षा फी संदर्भातील मुद्दा उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला आहे. सहकार विभागाच्या दोन वेगवेगळ्या पदांसाठी एकच आणि एकत्र परीक्षा घेतली जाणार असेल तर मग दोन पदांसाठी वेगवेगळी फी का? १००० रुपये ऐवजी २००० रुपये का?. एवढ्या #serious पणे विद्यार्थ्यांची लुट का? आणि कोणासाठी? असा प्रश्न आमदार पवार यांनी विचारला आहे.
दरम्यान, राज्यात मेगा भरती सुरू करण्यात आली असून तलाठी पदासाठी ४६४४ जागांसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर आता जिल्हा परिषद भरतीसाठीही अर्ज सुटले आहेत. झेडपीसाठी तब्बल १९४२० जागांसाठी भरती काढण्यात आली आहे.