जयंत पाटील रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला का गेले नाहीत? पाटलांनी दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 01:58 PM2023-11-30T13:58:54+5:302023-11-30T14:03:11+5:30
आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेस २४ ऑक्टोबर रोजी पुणे येथे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली होती.
मुंबई- राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांची गेल्या काही दिवसांपासून युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. ही यात्रा आता वाशिम जिल्ह्यात पोहोचली आहे. या यात्रेची सुरुवात २४ ऑक्टोबर रोजी पुण्यातून झाली, या यात्रेला राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी भेटी दिल्या. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजुनही या यात्रेला भेट दिलेली नाही, यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या चर्चांवर आज स्वत: माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोहोचली वाशिम जिल्ह्यात
आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला भेट का दिली नाही यावर बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले, "या यात्रेला माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर हे सहभागी झाले आहेत. यात्रेच्या वाटेवर जी लोक आहेत त्यांनी भेटी दिल्या आहेत. ही यात्रा महाराष्ट्रातील युवकांच्या प्रश्नावर आहे, या यात्रेचा समारोप १२ डिसेंबरला नागपूरला होणार आहे. यावेळी मी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.
'सरकार फक्त गोड बोलतं, मदत मिळत नाही'
"काही ठिकाणी सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. पीकविमा देण्याचे विमा कंपन्या टाळत आहे. केळीचे उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत, कापसालाही दर हवा तो मिळालेला नाही. नाशिक जिल्ह्यातही कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून द्यावा, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. सरकार फक्त गोड बोलत आहे, मदत मात्र मिळत नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
युवा संघर्ष यात्रा पोहोचली वाशिम जिल्ह्यात
सर्वसामान्य जनता, युवा, शेतकरी, महिलांचे प्रश्न सरकारने गांभीर्याने घ्यावे, यासाठी आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष पदयात्रा काढली असून, मराठवाड्यातील सेनगाव तालुक्यातून ही यात्रा २९ नोव्हेंबरला वाशिम जिल्ह्यातील व्याड, चिखली (ता.रिसोड) येथे दाखल झाली.
आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेस २४ ऑक्टोबर रोजी पुणे येथे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली होती. एकूण ४५ दिवसांच्या या पदयात्रेदरम्यान ८०० किलोमिटरचे अंतर पायदळ पूर्ण केले जाणार आहे. ही यात्रा २९ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातून रिसोड तालुक्यातील व्याड, चिखली सरनाईकमार्गे वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. चिखली येथे काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक, राकाॅंचे जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे, ज्येष्ठ नेते पांडूरंग ठाकरे, सुनिल पाटील, प्राचार्य अरुणराव सरनाईक यांच्यासह मान्यवरांनी या यात्रेचे स्वागत केले.