मुंबई : सायबर सिक्युरिटीसारख्या महत्त्वाच्या विषयाच्या ऑडिटचे काम कमी अनुभव असलेल्या आयसेक सिक्युरिटी कंपनीला का दिले, याचा खुलासा करण्यासंदर्भात ईडीने (सक्तवसुली संचालनालय) बुधवारी राष्ट्रीय शेअर बाजाराला कारणे दाखवा नोटीस जारी केल्याचे समजते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ही कंपनी स्थापन केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराकडून या संदर्भात खुलासा प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात मनी लॉड्रिंगचा आणखी एक नवा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारात झालेल्या को-लोकेशन घोटाळ्यात मनी लॉड्रिंग झाल्याच्या संशयावरून ईडीने मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांची ५ जुलै रोजी दिल्ली येथे तीन तास चौकशी केली होती. या चौकशीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी एनएसई-को-लोकेशन घोटाळ्यासंदर्भात पांडे यांना काही प्रश्न विचारत त्यांचा जबाब नोंदविला. पांडे यांचा जबाब मनी लॉड्रिंग कायद्यातील फौजदारी कलमांतर्गत नोंदवल्याचे समजते.
२०१० ते २०१५ या कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्व्हर आणि आयटी सिक्युरिटी ऑडिटचे काम संजय पांडे यांनी २००१ साली स्थापन केलेल्या आय-सेक सिक्युरिटीज प्रा. लि. या कंपनीला मिळाले होते. याच काळात एनएसईमध्ये को-लोकेशन घोटाळा झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. एनएसई-को-लोकेशन घोटाळ्यात निवडक ब्रोकरना फायदा करून देण्यात आला होता.
२०१८ मध्ये दाखल झाला होता गुन्हा
- सुरुवातीला सीबीआयने एनएसई घोटाळ्यामध्ये २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून तपास केला होता.
- सीबीआयने गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये केलेल्या तपासाच्या आधारे एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि समूहाचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम यांना यापूर्वीच अटक केली आहे.