मुंबई : सेन्सॉरशिपचे बंधन केवळ नाट्य आणि सिनेमाच्या कलाकृतींना असते. शिवाजी पार्कवर होणाऱ्या प्रक्षोभक भाषणांना सेन्सॉरशिप का नसते? या भाषणांची संहिता मंचावर जाण्यापूर्वी मागविली जाते का? असे परखड सवाल ज्येष्ठ अभिनेते - दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी उपस्थित केले.दादर येथील शिवाजी नाट्य मंदिराच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी पार पडलेल्या ‘चला, एकत्र येऊ या’ या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी पार पडलेल्या परिसंवादात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुस्काटदाबीविषयी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी, पालेकर म्हणाले की, शिवाजी पार्क असो वा रामलीला मैदान येथे कायमच प्रक्षोभक भाषणे केली जातात. त्यावर कोणाचेच बंधन नसते. याउलट समाजात घडलेल्या घटना सिनेमा, नाट्यकृतींतून प्रतिबिंबित होत असतात. तरीही जे आधीच घडले आहे, ते दाखविण्यावर सेन्सॉर बोर्ड बंदी घालते, हे चुकीचे आहे.हल्लीच्या काळात गप्प बसूनही निषेध करण्याला परवानगी नाही, हे वेगवेगळ्या घटनांमधून दिसून आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या यवतमाळच्या साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालून बसलेल्या महिलांना पोलिसांनी मैदानातून बाहेर काढले. त्या गप्प बसून केवळ निषेध करीत होत्या, या अभिव्यक्तीवरही सध्या मर्यादा आहेत. आपण प्रश्न विचारत नाही, ही आपली वृत्ती बदलली पाहिजे, असेही पालेकर यांनी आवर्जून नमूद केले. याप्रसंगी, समीना दलवाई यांनी आजही समाजात रुजलेल्या जात-धर्माविषयी वाढता तिढा धोकादायक असल्याचे सांगितले. तर साहित्यिक प्रवीण बांदेकर म्हणाले की, गेल्या वर्षी करण्यात आलेली पुरस्कारवापसी ही निषेधाची कृती होती. माझ्यातल्या उद्विग्न लेखकाने सनातनच्या आश्रमात जाऊन उलगडा केला. मात्र आपल्याकडील सक्षम यंत्रणा याचा शोध घेऊ शकत नाही ही दुर्दैवाची बाब आहे.साहित्यिका प्रज्ञा पवार म्हणाल्या की, ४० वर्षे उलटूनही ‘बलुतं’मध्ये मांडलेले वास्तव अजूनही समाजाने स्वीकारले नाही, ही सल आहे. प्रस्थापित व्यवस्थेला मोडीत काढायचे सामर्थ्य नारी शक्तीत आहे. सध्याच्या समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येणारा दबाव पाहता निषेधाचा हक्क प्रत्येकाने बजावायला हवा. तर गायक टी.एम. कृष्णा यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येणारी गदा घातक असून त्याविषयी विविध माध्यमांतून आवाज उठविला पाहिजे. त्या आवाजाचे माध्यम, भाषा वेगळी असली तरी चालेल; मात्र व्यक्त झाले पाहिजे, असे नमूद केले.मानवी स्वातंत्र्याची चिंता नाहीआजच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाला मानवी स्वातंत्र्याची चिंता राहिलेली नाही. निवडणुकीत कोणताही पक्ष निवडून आला तरी समाजातील वातावरण बदलणार नाही. आपले विविध प्रकारचे स्वातंत्र्य सध्या धोक्यात आहेत, आपण काय खातो? काय लिहितो? काय संवाद साधतो? यावर निर्बंध आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. आपल्या समाजात संवादामध्ये पारदर्शकता येणे गरजेचे आहे. - पुष्पा भावे
शिवाजी पार्कच्या भाषणांना सेन्सॉरशिप का नसते?- अमोल पालेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 1:19 AM