जोर का झटका धीरेसे : दोन-अडीच महिन्याचे वीजबिल एकत्रित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 07:39 PM2020-06-16T19:39:21+5:302020-06-16T19:39:47+5:30
लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिने बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरु करण्यात आले आहे.
मुंबई : लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिने बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरु करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या गेल्या दोन-अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. वीजबिलाचे प्रतिमाह विभाजन करून वीज वापराप्रमाणे मिळणारा स्लॅब बेनेफिटही देण्यात आला आहे.
एप्रिल व मे महिन्यात मीटर रिडींग घेणे लॉकडाऊनमुळे शक्य झाले नसल्याने जानेवारी ते मार्च-२०२० या तीन महिन्यातील वीज वापराच्या सरासरी युनिटप्रमाणे या दोन्ही महिन्याचे वीजबिल आकारण्यात आले. कमी वीज वापर असणाऱ्या महिन्यातील सरासरीप्रमाणे वीजबिल आकारण्यात आले. प्रतिबंधित भाग वगळता इतर ठिकाणी मीटर रीडिंग घेऊन प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे दोन-अडीच महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. मीटर रीडिंग व वीजबिल यात तफावत असणारी बिले दुरुस्त करून देण्यात येतील. एप्रिल, मे, जून महिन्यांत स्वतःहून रिडींग न पाठविणाऱ्या वीजग्राहकांना आता मीटर रिडींग घेतल्यानंतर अचूक व प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल पाठविण्यात येत आहे. हे वीजबिल लॉकडाऊन कालावधीतील दोन-अडीच महिन्यांचे असले तरी संगणकीय प्रणालीद्वारे बिलाची मासिक वापरानुसार विभागणी करून युनिट व स्लॅबप्रमाणे वीजदर लावून (स्लॅब बेनिफिटसह) देण्यात येत आहे.
..............................
- दोन महिन्यांचे वीजबिल ३३० युनिट असल्यास ३३० युनिटचा स्लॅब दर न लावता मासिक प्रत्येकी १६५ युनिटप्रमाणे स्लॅब दर लावण्यात येत आहे.
- एप्रिल व मे महिन्यांतील सरासरी युनिटचे व बिलाची रक्कम भरली असल्यास फिक्स चार्जेस, विद्युत शुल्क वगळून उर्वरित रकमेचे समायोजन करण्यात येत आहे.