Join us

'दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू'; सुजय विखेंच्या प्रवेशावरुन पवारांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 8:43 PM

सुजय यांचा खासदारकीचा बाल हट्ट यावर सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

मुंबई - काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नगर लोकसभेची राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली जागा काँग्रेसला देऊन आपल्याला उमेदवारी मिळावी, ही इच्छा पूर्ण न झाल्याने डॉ. सुजय यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी खोचक टीका केली आहे. 

सुजय यांचा खासदारकीचा बाल हट्ट यावर सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांचा हट्ट पुरविण्याची जबाबदारी त्यांच्या वडिलांची आहे. दुसऱ्याच्या मुलाचा बालहट्ट माझ्या पक्षाने का पुरवावा, असंही शरद पवार यांनी मुंबईत एका कार्यक्रमाला आल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. सुजय विखे-पाटील भाजपामध्ये गेल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. पालकांनी विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीच्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तर, विरोधी पक्षात फोडाफोडी करून उमेदवाराला स्वपक्षात घेणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय खासदार शरद पवार यांनी घेतला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची माघार म्हणजे युतीचा मोठा विजय आहे. राजकीय वारं ओळखून पवारांनी माघार घेतल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी युतीचा 'फुसका वारा' म्हणत टीका केली. तसेच माढ्यासह उर्वरित महाराष्ट्र जिंकू, आणि मुख्यमंत्र्यांना वर्षावर येऊन पेढा भरवू, असे धनंजय मुंडें यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेससुजय विखेभाजपा