रेल्वे प्रवाशांनी रात्र रस्त्यावर का काढायची?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 09:19 AM2023-05-29T09:19:25+5:302023-05-29T09:21:43+5:30

रेल्वे स्टेशनच्या हद्दीत कोणतेही गुन्हे घडू नयेत म्हणून शेवटची लोकल गेल्यावर तेथे कोणाला थांबू दिले जात नाही, असे त्याचे समर्थन केले जाते. 

Why should railway passengers spend the night on the road rpf tain passengers | रेल्वे प्रवाशांनी रात्र रस्त्यावर का काढायची?

रेल्वे प्रवाशांनी रात्र रस्त्यावर का काढायची?

googlenewsNext

मिलिंद बेल्हे, 
सहयाेगी संपादक

मध्य असो की पश्चिम रेल्वे स्थानक, यावर रात्री-अपरात्री अडकून पडलेल्या प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बलाचे जवान ज्या पद्धतीने ढोसून, काठीचे फटके देऊन स्थानकाबाहेर हाकलतात, तो प्रकार अस्वस्थ करणारा आहे. रेल्वे स्टेशनच्या हद्दीत कोणतेही गुन्हे घडू नयेत म्हणून शेवटची लोकल गेल्यावर तेथे कोणाला थांबू दिले जात नाही, असे त्याचे समर्थन केले जाते. 

पण बाहेरगावाहून येणाऱ्या, अनेकदा रेल्वेच्या घोळामुळे उशिरा पोहोचणाऱ्या प्रवाशांची काहीही चूक नसताना त्यांनाही पहिल्या लोकलची वाट पाहात, काठीचा प्रसाद खात रस्त्यावर रात्र काढावी लागते. अनेकदा सोबत महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती असतात, सामान-सुमान असते. अशा स्थितीत मध्यरात्री तीन-साडेतीन तास रस्त्यावर थांबणे किती धोकादायक ठरू शकते, याचे भान या यंत्रणांना नाही का? स्थानक परिसरात व्यवस्था नसल्याने अनेकांना नैसर्गिक विधीही रोखून धरावे लागतात. पावसाळ्यात तर थांबायला नीट जागा नसल्याने ओल्या अंगाने आडोशाला कसेबसे उभे राहावे लागते. तेव्हा प्रवाशांच्या त्रासाला पारावार उरत नाही. 

जेथे मेल-एक्स्प्रेस थांबतात, अशा स्थानकांत प्रवाशांची गर्दी तुलनेने अधिक असते. रेल्वेच्या लेट झालेल्या गाड्या पकडणाऱ्या, सकाळी लवकर सुटणाऱ्या गाड्यांनी जाणाऱ्या किंवा उशिराने मुंबई, ठाणे, कल्याण, बोरीवली, अंधेरी, दिवा, पनवेल येथे पोहोचणाऱ्या गाड्यांतून उतरलेल्या प्रवाशांचा यात भरणा असतो. उशिरा आलेली विमाने, कनेक्टेड ट्रेन, कधी वाहतूक कोंडीत अडकलेल्या बस-टॅक्सीतील प्रवासीही यात असतात. शेवटची ट्रेन चुकली की त्यांची परवड सुरू होते.

रस्त्यावर हाकलून दिल्यानंतर भिकारी, गर्दुल्ले, आगाऊपणा करत अचकट-विचकट शेरे मारणारे, मोकाट जनावरे यांचा सुळसुळाट असतो, तो वेगळाच. जवळच्या शहरात, गावात जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सी अव्वाच्या सव्वा पैसे मागतात. मीटरचा वापर होत नाही आणि हे ठाऊक असूनही तेथे पोलिस कधीच नसतात. यातील प्रत्येकाला ॲपबेस्ड टॅक्सी करून घर गाठणे शक्य होत नाही, परवडत नाही. या प्रवाशांना स्थानकातील वेटिंग रूममध्येही थांबू देत नाहीत. त्यामुळे जीव मुठीत धरून अपरात्री तीन-साडेतीन तास काढण्याचे दिव्य दररोज हजारो प्रवाशांना पार पाडावे लागते. त्यामुळे पहिल्या गाडीपर्यंत स्थानकात थांबू न देण्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हायलाच हवा. 

तिकीट, पासधारकांना तरी थांबू द्या!
जर रेल्वे रात्रभर लोकल सोडणार नसेल, तर किमान ज्यांच्याकडे रेल्वेच्या मेल-एक्स्प्रेसचे तिकीट किंवा लोकलचे तिकीट-पास असेल अशांना स्थानकात थांबू द्यायला काय हरकत आहे? जर अशा प्रवाशांमुळे जर गुन्हे घडत असतील, तर स्थानकातील रेल्वे पोलिस बल, सीसी कॅमेरे यांचा काय उपयोग? अशा पद्धतीने प्रवाशांना स्थानकाबाहेर हाकलल्याने किती गुन्हे कमी झाले, हेही रेल्वेने जाहीर करायला हवे. म्हणजे हा निर्णय मनमानीचा नसून योग्य आहे, असे त्याचे समर्थन तरी करता येईल.

Web Title: Why should railway passengers spend the night on the road rpf tain passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे