मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. गरज पडल्यास राज्य गहाण ठेऊ, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक उभारू, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरुन सुळे यांनी फडणवीसांना टार्गेट केलं आहे. पाच लाख कोटींच्या कर्जाने राज्य गहाण ठेवायची वेळ आणायची आणि खापर मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर फोडायचं? ही नेहमीची जुमलेबाजी होती की धूर्त राजनीती? असा प्रश्नही सुळे यांनी विचारला आहे.
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना स्वत:वर भरवसा नाय काय? अशा प्रश्न विचारला. तसेच बाबासाहेबांच्या स्मारकावरुन राजकारण करता की, जुमेलबाजी असे प्रश्नही त्यांनी विचारला आहे. 5 लाख कोटी रुपयांच्या कर्जाने राज्य गहाण ठेवायचं आणि खापर बाबासाहेबांच्या स्मारकावर फोडायचं, हे राजकारण की जुमलेबाजी असा सवाल उपस्थित करत सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी गरज पडल्यास राज्य गहाण ठेवू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. ठाण्यात रिपब्लीकन पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही त्यांच्यावर आगपाखड केली होती. बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य गहाण ठेवायची नव्हे, तर इच्छाशक्तीची गरज असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले होते.