मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीचे गंभीर आरोप झाल्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह परिवहन विभागातील अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन, भाजपाने शिवसेनेला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले आहेत.
आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप गजेंद्र पाटील यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने 300 कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचेही तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकावर पुन्हा आरोपांचे शिंतोडे उडविण्यात येत आहेत. त्यातच, भाजपा नेते आक्रमक होताना दिसत आहेत. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन अनिल परब यांना लक्ष्य केलंय.
'कॅबिनेट मंत्र्याविरुद्ध स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी कशी काय होऊ शकते? अनिल परब यांच्यासाठी वेगळा नियम का का?. जर, संजय राठोड राजीनामा देत असतील तर मग'मातोश्री'तील खास माणसाला सहानुभूती का?, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे. तसेच, याप्रकरणी सीबीआय चौकशीच न्याय मिळवून देईल, त्यापेक्षा काही कमी नाही', असे म्हणत सीबीआय चौकशीची मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.
किरीट सोमैय्यांनीही अनिल परब यांना केल लक्ष्य
अनिल परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल झाल्यानंतर भाजपाने पुन्हा महाविकास आघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. अनिल परब हे केवळ दोन महिन्यांचे पाहुणे आहेत. त्यांची मंत्रिमंडळातील गच्छंती अटळ आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. या सगळ्या घोटाळ्यांची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून राज्यपालांनीही परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असं किरीट सोमय्या यांनी सांगितले.
अनिल परब यांनी आरोप फेटाळले
अनिल परब यांनी आपल्यावरील आरोपांबाबत ट्विटर अकाऊंटवर स्पष्टीकरण दिलं आहे. "मंत्र्यांवर आरोप करुन राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मलिन करणे, या राजकीय हेतून केलेली ही तक्रार आहे", असं ट्विट अनिल परब यांनी केलं आहे. निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक येथे दिलेली तक्रार पूर्णत: निराधार आणि खोटी असल्याचं परब यांनी म्हटलं आहे. या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करत असून चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.