ॲडमिशन घेता का ॲडमिशन? ११ वीच्या ६० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 08:29 AM2023-07-18T08:29:43+5:302023-07-18T08:30:25+5:30
अकरावीच्या ६० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त; मुंबई-पुण्यात सर्वाधिक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात अकरावी प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या आतापर्यंत पार पडल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आधीच्या फेऱ्यांत प्रवेश मिळाला नाही किंवा काही कारणाने हुकला अशा विद्यार्थ्यांसाठी आता शिक्षण संचालनालयाकडून विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. अकरावीच्या आतापर्यंत पार पडलेल्या तीन फेऱ्यांत पाच विभागांतून आतापर्यंत जवळपास ४० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, ६० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे यंदाही अकरावी प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त राहण्याची भीती अनुदानित महाविद्यालये आणि खासगी संस्थाचालकांना सतावू लागली आहे.
राज्यात मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच महानगर क्षेत्रांत अकरावी प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीने सुरू आहेत. पहिल्या तीन फेऱ्यांनंतर या पाच विभागीय क्षेत्रातील एकूण रिक्त जागांची परिस्थिती स्पष्ट झाली असून, सर्वाधिक रिक्त जागा मुंबई, पुण्यात आहेत.
विशिष्ट कॉलेजसाठी आग्रह नको
विशेष फेरीचे आयोजन हे शिक्षण संचालनालयाकडून आतापर्यंत कोणत्याही फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांचे नाव यादीत येऊनही काही कारणास्तव हुकले आहेत अशांसाठी केले आहे. नामांकित महाविद्यालयांतील जागा या आधीच फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विशिष्ट महाविद्यालयाचा आग्रह न धरता या फेरीत मागील कटऑफ पाहून महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरावेत आणि प्रवेश निश्चित करावेत, असा सल्ला शिक्षण अधिकारी आणि तज्ज्ञ देत आहेत.
पुन्हा संधी नाही
विशेष फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
प्रवेश नाकारल्यास त्यांना यापुढे प्रवेशाची संधी दिली जाणार नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांना यापुढील कोणत्याही फेरीत प्रवेशाची संधी मिळणार नाही, अशा सूचना शिक्षण संचालनालयाने जारी केल्या आहेत.
...असे आहे वेळापत्रक
१७ ते २० जुलै : प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे
२४ जुलै : गुणवत्तायादी जाहीर (सकाळी १० वाजता)
२४ ते २७ जुलै : प्रवेश घेता येणार
याच दरम्यान कोट्यातील प्रवेशही सुरू राहणार