लसीकरणानंतर अँटिबॉडीज तपासणी करायची कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:06 AM2021-07-19T04:06:06+5:302021-07-19T04:06:06+5:30
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता देशात सगळीकडेच लसीकरणाने जोर धरला आहे. प्रत्येक जण लस टोचून घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर ...
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता देशात सगळीकडेच लसीकरणाने जोर धरला आहे. प्रत्येक जण लस टोचून घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहे. आता लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर आपला कोरोनापासून बचाव होईल का याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यासाठीच अनेक जण आपल्या शरीरातील अँटिबॉडीज तपासत आहेत. विशेषतः अँटिबॉडीज तपासण्यासाठी तरुण जास्त प्रमाणात लॅबमध्ये येत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना होऊन गेलेले व लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले नागरिक उत्सुकतेपोटी लॅबमध्ये तपासणीसाठी येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र ही तपासणी करणे गरजेचे आहे का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. कारण अनेकदा लसीचे दोन डोस पूर्ण होऊनदेखील अँटिबॉडी शरीरात आढळत नसल्याने अनेकांचा गोंधळ उडत आहे. मात्र याला अनेक कारणेदेखील असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अतिशय आवश्यकता वाटली तरच अँटिबॉडी तपासाव्यात अन्यथा विनाकारण अँटिबॉडी तपासू नयेत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शहरात झालेले लसीकरण
पहिला डोस - ४८,२९,३००
दुसरा डोस - १३,३९,०८५
रोज ५०च्या वर तपासण्या
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक जण सावध झाले आहेत. त्यामुळे या काळात आपल्याला कोरोनाची बाधा होणार की नाही याबाबत सर्वांच्या मनात शंका उपस्थित होत आहे. यामुळे आपल्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँटिबॉडीज तयार झाल्यात का, या उत्सुकतेपोटी दिवसाला किमान ५० हून अधिक तरुण लॅबमध्ये येऊन तपासणी करत आहेत.
तरुणांची संख्या जास्त
अनेक तरुणांना आता लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर कार्यालयांमध्ये बोलावले जाऊ लागले आहे. त्याच प्रमाणे काहीजण कामानिमित्त इतर राज्यातदेखील जाणार आहेत. त्यामुळे आपल्या मनातील भीती दूर करण्यासाठी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात अँटिबॉडीजची तपासणी करत आहेत.
तपासणी करण्याची गरज आहे का?
साधारणतः कोरोनाची बाधा झाल्यानंतर व लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यावर दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर आपल्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. मात्र प्रत्येकवेळी तपासणीत अँटिबॉडीज आढळतीलच असे नाही. आपल्या शरीरात दोन प्रकारच्या इम्युनिटी तयार होतात त्यामुळे अनेकदा अँटिबॉडीजचा अहवाल कधी पॉझिटिव्ह तर कधी निगेटिव्ह येऊ शकतो. यामुळे तपासणी करणाऱ्याचा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे अतिशय गरज वाटली तरच अँटिबॉडी तपासाव्यात अन्यथा अँटिबॉडीज तपासल्या नाही तर उत्तम.
- डॉ. जितेश ठाकूर