राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीचं मतदान आज होत आहे. यासाठी राज्याच्या विधानसभेत सर्व आमदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. गुवाहटीच्या निसर्ग सौंदर्याचं आपल्या स्टाइलनं वर्णन केलेले शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. 'काय झाडी, काय डोंगर, काय हाटील...एकदम ओक्के!', हा शहाजी बापू यांचा संवाद इतका लोकप्रिय झाला की यावर सोशल मीडियात यावर अनेक मिम्स आले. इतकंच काय तर गाणीही आली.
जिथं जिथं शहाजी बापू जातात तिथं आता त्यांच्या व्हायरल डायलॉगची मागणी केली जाते. शहाजी बापू देखील सुरुवातीला सर्वांच्या आग्रहाखातर त्यांच्या स्टाइलमध्ये प्रतिक्रिया देखील देत होते. पण आता खुद्ध शहाजी बापूच याला कंटाळले आहेत. तसं त्यांनी मिश्किलपणे आज बोलूनही दाखवलं.
देशाच्या नव्या राष्ट्रपतींचं अभिनंदन तुम्ही तुमच्या स्टाइलमध्ये कसं कराल असं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी शहाजी बापू पाटील यांना विचारलं. त्यावर शहाजी यांनी नव्या राष्ट्रपतींना मी आता नाही २२ तारखेला शुभेच्छा देईन असं म्हटलं.
"माझ्या स्टाइलमध्ये नव्या राष्ट्रपतींना मी २२ तारखेला शुभेच्छा देईन आणि आता कशाला ती स्टाइल. बंद करूया. कटाळा आलाय. महाराष्ट्रातील माणसं आता कटाळतील. याचं आता दररोज कुठं ऐकायचं म्हणतील", असं शहाजी बापू पाटील मिश्किलपणे म्हणाले.
महाराष्ट्रातून २०० मतं मिळतील"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्यापद्धतीनं आखणी केली असेल त्यापद्धतीनं २०० किंवा त्यापेक्षा अधिक मतं द्रौपदी मुर्मू यांना पडतील. व्यक्तीश: मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या राजकीय डावपेचावर विश्वास आहे. ते २०० चा आकडा पार करतील असा मला विश्वास वाटतो", असंही शहाजी बापू पाटील म्हणाले.