राजकारणातल्या महिलांची बदनामी कशासाठी?
By अतुल कुलकर्णी | Published: March 20, 2023 07:58 AM2023-03-20T07:58:35+5:302023-03-20T07:58:53+5:30
गेल्या काही दिवसांतील घटना पाहिल्या तर सुसंस्कृत महिलांनी राजकारणात यायचेच नाही का..? असा प्रश्न प्रत्येक जण विचारत आहे.
राजकारणात काम करणाऱ्या महिलांची किंवा राजकीय नेत्यांच्या कुटुंबांची बदनामी करण्याचे प्रमाण शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात टोकाला गेले आहे. गेल्या काही दिवसांतील घटना पाहिल्या तर चांगले काम करण्याची इच्छा असणाऱ्या, सुसंस्कृत महिलांनी राजकारणात यायचेच नाही का..? असा प्रश्न प्रत्येक जण विचारत आहे. राजकारणाची पातळी किती घसरली आहे हे सांगण्यासाठी, शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा व्हायरल झालेला एक व्हिडीओ पुरेसा आहे. राजकारणात नाव कमावण्यासाठी आयुष्य खर्ची घालावे लागते. दहा, पंधरा वर्षे मेहनत केल्यानंतर थोडे नाव होते. लोक ओळखू लागतात. अशावेळी त्या नेत्याची इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बदनामी करण्याने त्या नेत्याच्या आजपर्यंतच्या सगळ्या मेहनतीवर आपण पाणी फिरवत आहोत, याचेही भान कोणाला उरलेले नाही.
एक बड्या पक्षाचा प्रमुख नेता या सगळ्या प्रकारावर प्रचंड अस्वस्थ होत म्हणाला, चांगल्या घरातल्या महिलांनी राजकारणात यायचेच नाही का..? याचे उत्तर राजकीय नेत्यांनीच द्यायचे आहे. ज्या पद्धतीने चित्रा वाघ, अमृता फडणवीस, शीतल म्हात्रे, प्रियंका चतुर्वेदी, सुप्रिया सुळे या व अशा महिला नेत्यांना ट्रोल केले जाते, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. जरी काही महिला नेत्यांची भूमिका मांडण्याची पद्धत आक्रमक असेल, वेगळी असेल तरीदेखील त्यांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करणे, त्यांच्याबद्दल वाटेल त्या कॉमेंट्स सोशल मीडियात करणे यावरून असे करणाऱ्यांची केवळ विकृतीच नाही तर सामाजिक मूल्यांचे अध:पतन ठळकपणे समोर येते. ट्रोल करणारे कोणत्याही पक्षाचे किंवा विचाराचे असोत, अशा गोष्टींना आजच रोखले नाही तर, जशा निवडणुका जवळ येतील तसे या गोष्टी भस्मासुरासारख्या वाढतील. त्यातून कोणीही वाचू शकणार नाही.
महाराष्ट्र असा कधीही नव्हता. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान म्हणून ज्या कणखरपणे उभ्या राहिल्या, त्यामुळे समस्त महिला वर्गाचीच नव्हे तर देशाची मान उंचावली. केवळ आपल्याकडेच नाही तर जगभरात अनेक महिलांनी आपल्या कामातून स्वतःची वेगळी छाप जगावर पाडली आहे. भारतात उद्योग, साहित्य, सामाजिक सेवा, चित्रपट अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी स्वतःचे नाव उंचीवर नेले आहे. महाराष्ट्र तर अशा गुणवंत महिलांची खाण आहे. सावित्रीबाई फुले यांच्यापासून ते तरुण पिढीतल्या महिला नेत्यांपर्यंत भली मोठी यादी करता येऊ शकेल. मात्र, गेल्या काही दिवसांत राजकारणात काम करताना महिला नेत्यांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. त्यांना बदनाम केले जात आहे. त्यांच्या आडून घाणेरडे राजकारण खेळले जात आहे, हे थांबले नाही तर भविष्यात तरुण मुली राजकारणात येण्याआधी दहा वेळा विचार करतील. जर चांगल्या महिला राजकारणात आल्या नाहीत तर राजकारणाचाच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक समतोल पूर्णपणे उद्ध्वस्त होईल.
आपल्याकडे जी-२०चा भाग म्हणून सी-२० आजपासून नागपूरला सुरू होत आहे. सी-२० म्हणजे सिव्हिल सोसायटी. म्हणजेच नागरी समाज. या अनुषंगाने बैठकीत महिलांचा सन्मान आणि अधिकार हा देखील विषय आहे. जगभरामध्ये महिला विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक कमवत आहेत. शिवाय त्यांच्या कामाला जगातून समर्थन मिळत आहे. अनेक देश त्यांच्याकडे महिलांना सन्मानाची वागणूक देतात, हे वेळोवेळी समोर आले आहे. न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न या पहिल्या जागतिक महिला नेत्या आहेत, ज्यांनी आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आणले.
यूएस सिनेटर टॅमी डकवर्थ यांनी २०१८ मध्ये इतिहास रचला. आपल्या नवजात बाळासह सिनेटच्या मतदानाला जाणाऱ्या पहिल्या सिनेटर बनल्या. एली रीव्हज या ब्रिटिश खासदाराने त्यांच्या छोट्या मुलासह शपथ घेतली. ऑस्ट्रेलियन सिनेटर लॅरिसा वॉटर्स यांनी २०१७ मध्ये मतदानादरम्यान त्यांची मुलगी आलिया जॉयला स्तनपान केले. काही इस्लामिक देशांनी तर त्यांच्या संसदेत महिलांना आरक्षण देऊ केले आहे. ही काही उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. आपल्याकडे मात्र आमदार सरोज अहिरे त्यांच्या लहान बाळासह विधानसभेत आल्या. तेव्हा त्यांच्यासाठी एक हिरकणी कक्ष केला होता. त्याची वाईट अवस्था पाहून त्या माध्यमांसमोर रडल्या...त्यांचा गळा भरून आला..! भारत देश ‘जी-ट्वेंटी’च्या माध्यमातून जगाला आपल्या संस्कृती, वैभवाचे दर्शन घडवणार आहे. त्यामुळे सी-२० ही परिषद देखील तेवढीच महत्त्वाची आहे. मात्र, त्या पार्श्वभूमीवर आपल्याच राज्यात महिला राजकीय नेत्यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे भारताच्या प्रयत्नांमध्ये खीळ बसणार आहे.
जी-२० किंवा सी-२० यासाठी येणाऱ्या शिष्टमंडळांना आपल्या बकाल परिसराचे दर्शन घडू नये म्हणून ज्या-ज्या भागातून त्यांचा दौरा गेला त्या ठिकाणच्या बकाल वस्त्यांवर पडदे टाकले गेले. दौरे संपले की, पडदेही हटवण्यात आले. बकाल वस्त्या पुन्हा तशाच उघड्या पडल्या. मात्र, नागपूरला आजपासून सुरू होणाऱ्या सी-२० परिषदेत जेव्हा सिव्हिल सोसायटीची चर्चा होईल त्यावेळी तुम्ही तुमच्या राजकीय महिला नेत्यांना जर नीट वागवत नसाल, तर सामान्य महिलांचे काय..? असा प्रश्न कोणी केला तर भारताच्या प्रतिनिधींकडे काय उत्तर असेल..?