लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परिवहन विभागाने राज्यात अत्याधुनिक आणि संगणकीय प्रणालीवर आधारित यंत्राद्वारे वाहनाचे तपासणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच आरटीओतील जागेत वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्र स्थापन करून संपूर्ण संगणकीय चाचणी प्रणालीवर आधारित अत्याधुनिक केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एजंटचा होणारा हस्तक्षेप थांबणार आहे.
रिक्षा, बस, ट्रक, आदी वाहनांकडे फिटनेस सर्टिफिकेट अर्थात योग्यता प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. मुंबईत आरटीओ परिसरात परिवहन संवर्गातील वाहनांची फिटनेस चाचणी होते. आता फिटनेस तपासणी संगणकीय प्रणालीवर आधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या परिवहन विभागाने नुकताच हा निर्णय घेतला आहे. सध्या ही प्रणाली फक्त नाशिक येथे सुरू आहे. मुंबईत अजूनही वाहन निरीक्षण परीक्षण केंद्र झालेले नाही.
मुंबईत कुठे होणार? राज्यात परिवहन विभागाकडून मुंबईतील एसटीच्या कुर्ला, नेहरूनगर आगाराबरोबरच ताडदेव आणि अंधेरी येथे तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे.
एजंट हवाय कशाला ? संगणकीय प्रणालीद्वारे केली जाणारी ही तपासणी इन कॅमेरा केली जाणार आहे. यात वेगवेगळ्या उपकरणांद्वारे वाहनांचे भाग तपासले जाणार आहेत. संगणकीय प्रणाली अत्याधुनिक असल्याने दोषमुक्त निरीक्षण आणि तपासणी केली जाणार आहे.
अचूक तपासणी होणार आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात एजंट यांचा वावर सुरू असतो. परवाना काढण्यापासून ते सर्वच कामे करतात. परंतु, आता संगणकीय प्रणालीवर आधारित फिटनेस प्रमाणपत्र मिळणार असल्याने या गोष्टीला चाप बसणार आहे. वाहनाच्या फिटनेसची तपासणी संगणकीय प्रणालीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे यात एजंट किंवा मानवी हस्तक्षेप थांबणार असून, अचूक तपासणी होणार आहे.