मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये रात्री जास्त गरम का होतं? समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 08:07 PM2024-05-30T20:07:50+5:302024-05-31T15:26:53+5:30

देशातल्या अनेक शहरी भागांमध्ये दिवसाच नाहीतर रात्रीही प्रचंड प्रमाणात गरम होत असते. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या भारतातील प्रमुख शहरे ही रात्रीच्या वेळीही उष्ण असतात.

Why There is no relief even at night in cities revealed in the CSE report | मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये रात्री जास्त गरम का होतं? समोर आली धक्कादायक माहिती

(Thinkstock)

Heat Wave :मुंबई, दिल्लीसह देशभरात प्रचंड उकाडा वाढला आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. उष्माघातामुळे अनेकांचा बळी देखील गेला. काही ठिकाणी तर जमावबंदीसारखे आदेश देण्यात आले आहेत. देशभरात अनेक ठिकाणी तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे तर अनेक ठिकाणी पारा ५० अंशांच्या जवळ आहे. दरम्यान, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटचा एक नवीन अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये शहरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उष्णता का आहे याबद्दल सांगण्यात आले आहे.

शहरीकरणामुळे, भारतातील १४० हून अधिक मोठ्या शहरांचा परिसर हा रात्रीच्या वेळी शहरे नसलेल्या भागांपेक्षा ६० टक्के जास्त उष्ण आहेत. वाढत्या काँक्रीटच्या  जंगलामुळे आणि वाढत्या आर्द्रतेच्या पातळीमुळे भारतातील शहरे अधिक उष्णता अनुभवत आहेत. गेल्या काही वर्षांसारखी परिस्थितीआता शहरांमध्ये राहिलेली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी शहरात तितकी थंडी राहिलेली नाही. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने जानेवारी २००१ ते एप्रिल २०२४ पर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई या ६ महानगरांचे विश्लेषण केले. यामध्ये हवेचे तापमान, जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान आणि उन्हाळी हंगामात असलेल्या आर्द्रतेचे विश्लेषण करण्यात आले आहे.

सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या अहवालानुसार वाढलेल्या आर्द्रतेमुळे सर्व शहरी भागांमध्ये तापमानवाढ होत आहे. दिल्ली आणि हैदराबादमधील हवेच्या तापमानात किंचित घट झाल्यामुळेही त्याचा परिणाम दिसून येतो. बेंगळुरू वगळून इतर पाच महानगरांमध्ये २००१ ते २०१० च्या सरासरीच्या तुलनेत २०१४ ते २०२३ पर्यंत उन्हाळ्यातील सरासरी सापेक्ष आर्द्रता ५ ते १० पटीने वाढली आहे.

दुसरीकडे, अर्बन हीट आयलंडच्या परिणामासाठी शहरीकरण जबाबदार असल्याचे मानले जाते. ‘शहरी उष्णता बेट म्हणजे काँक्रीट आणि डांबरी पृष्ठभाग दिवसा उष्णता शोषून घेतात आणि संध्याकाळी सोडतात, ज्यामुळे रात्रीचे तापमान जास्त होते. कालांतराने, या तापमानवाढीचा परिणाम पाऊस आणि प्रदूषणासह हवामानाच्या इतर पैलूंवर होतो. गेल्या दोन दशकांत रात्रीच्या तापमानात वाढ होण्यास शहरीकरण आणि स्थानिक हवामानातील बदलांनी मोठं योगदान दिले आहे. देशभरातील या सर्व शहरांमध्ये वाढलेल्या तापमानाचा प्रभाव दर दशकात ०.२ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. यामुळे, एकूण जागतिक तापमान वाढीपैकी सुमारे ३७.७३ टक्के वाढ ही शहरीकरणावर आधारित होती. ही वाढ आसपासच्या गैर-शहरी भागांपेक्षा ६० टक्के अधिक होती.

महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या महानगरांसह देशाच्या सर्वच भागात कडक उन्हाचा तडाखा बसत असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. लोकांचे आरोग्यही बिघडत असून त्यांच्या कामावरही परिणाम झाला आहे.
 

Web Title: Why There is no relief even at night in cities revealed in the CSE report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.