Join us

१० तास प्रवास करायचा तर वंदे भारतमधून कशाला? कमी खर्चात विमानाने तासात पोहोचतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:16 AM

कोकण रेल्वेवरील वंदे भारत ही देशातील सर्वात स्लो वंदे भारत ठरणार आहे. 

गेल्या महिनाभरापासून प्रतिक्षा असलेली मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आज रुळावर येणार आहे. पावसाळी वेळापत्रकानुसार कमी वेग आणि आठवड्यातून तीनवेळा ही ट्रेन धावणार आहे. या ट्रेनच्या तिकीट दरांवरून आता लोकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. कोकण रेल्वेवरील वंदे भारत ही देशातील सर्वात स्लो वंदे भारत ठरणार आहे. 

Vande Bharat Mumbai-Solapur Express Experience: वंदे भारत एकदम हायफाय पण धन्य त्यांचे वायफाय! तिकिटांत भेदभाव... कसा वाटला पुण्यापर्यंत प्रवास...?

पावसाळ्यात ५७ किमी प्रतितास एवढ्या वेगाने ही ट्रेन धावणार आहे. म्हणजे जवळपास निम्म्या वेगाने. दुसरी बाब म्हणजे या ट्रेनच्या एक्झिक्युटीव्ह कोचचे तिकीट 3,535 रुपये ठेवण्यात आले आहे. या ट्रेनचे बुकिंगही २६ जूनपासून सुरु झाले आहे. गणपतीच्या काळातील तिकीटे फुल झालेली आहे. हे वगळता बाकी सर्व फेऱ्यांची तिकीटे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. 

२९ जूनला मडगाव ते सीएसटी जाणाऱ्या ट्रेनची तिकीटे रिक्त दिसत आहेत. गोव्यातील निवासी हर्षा मुरकुडकर यांनी वंदे भारतची वेळ आणि तिकीट दरावर नाराजी व्यक्त केली आहे. जर एवढे पैसे मोजून १० तास एखाद्या ट्रेनमध्ये बसून प्रवास करायचा असेल तर त्यापेक्षा लोक २२०० रुपयांत विमानाने तासाभरात मुंबई-गोव्याला पोहोचतात, असे त्या म्हणाल्या. वंदे भारतचे तिकीट खरेदी करणे तोट्याचा सौदा आहे, असे त्या म्हणाल्या. 

एकंदरीत मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांना ही ट्रेन परवडणारी नसली तरी मधील जी स्थानके आहेत, त्यांच्यासाठी ती चांगली ठरणार आहे. सामान्य दिवसात ट्रेनचा वेग 75 किमी प्रतितास इतका असेल. 

पावसाळ्यातच १० तासांचा प्रवास...वंदे भारत ट्रेनला पावसाळ्यातच मुंबई ते गोवा गाठण्यासाठी दहा तास लागणार आहेत. इतर वेळी 586km चे अंतर आणि ११ स्थानकांवर थांबण्यासाठी 7.50 तास लागणार आहेत. सध्याच्या कोकण रेल्वे मार्गावरील वेगवान ट्रेनला हे अंतर कापण्यासाठी ८.५० तासांचा वेळ लागत आहे. 

टॅग्स :वंदे भारत एक्सप्रेसमुंबईगोवा