उबाठाने गणेशोत्सवावर बंदी का घातली, हे लोकसभेच्या निकाला नंतर उघड; आशिष शेलार यांची टिका
By मनोहर कुंभेजकर | Published: June 21, 2024 11:57 AM2024-06-21T11:57:22+5:302024-06-21T11:58:20+5:30
शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने माटुंग्यात यशवंत नाट्य मंदिरात झालेल्या 'शिवकल्याण राजा' कार्यक्रमात आ. ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
मुंबई-कोरोनाचे निमित्त करुन सार्वजनिक गणेशोत्सवावर बंदी घातली, लालबागचा राजाला विराजमान करु दिले नाही, हिंदू सण साजरे करू दिले जात नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघ नखांची खिल्ली उडवली जात होती, राम मंदिराच्या तारखेवर टीका केली जात होती, राम वर्गणीची खिल्ली उडवली जात होती हे सगळे उबाठाकडून कशासाठी केले जात होते, हे लोकसभा निवडणुकीत त्यांना पडलेल्या एका विशिष्ट वर्गाच्या मतांवरुन स्पष्ट झाले, अशी खरमरीत टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.
मुंबई भाजपाच्या वतीने आयोजित "मुंबईश" गणेशोत्सव स्पर्धा २०२३ चे बक्षीस वितरण गुरुवारी शानदार सोहळ्यात पार पडले. किंग्ज सर्कलचे जी.एस.बी.सेवा मंडळ, शिवडीचे पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, जोगेश्वरीचे बांद्रेकरवाडी मित्र मंडळ ही तीन मंडळे यावर्षी तीन वेगवेगळ्या गटात प्रथम मानकरी ठरली. 3 लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने माटुंग्यात यशवंत नाट्य मंदिरात झालेल्या 'शिवकल्याण राजा' कार्यक्रमात आ. ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आमदार प्रसाद लाड, महासंघाचे जयेंद्र साळगावकर, सुरेश सरनौबत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, कोकण विकास आघाडी यांच्या सहकार्याने स्पर्धा संपन्न झाली होती. सुमारे 2 हजार मंडळानी या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट मूर्ती, सजावट व देखावा, स्वच्छता/ परिसर व सामाजिक कार्य या निकषात ३ लाखांचे प्रथम पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी १ लाख ५० हजार रुपये तर तृतीयसाठी ७५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. ११ हजाराची १२ उत्तेजनार्थ तर मुर्तीकार आणि परिसर स्वच्छता, देखावा यासाठी विशेष बक्षिसे देण्यात आली.
यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान ,अजरामर इतिहासाची उजळणी करुन या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य विषद केले. कार्यक्रमाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.