विरोधी पक्षनेत्यांचा आवाज आमच्या वेळी का दबला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:09 AM2021-03-13T04:09:02+5:302021-03-13T04:09:02+5:30
विरोधी पक्षनेत्यांचा आवाज आमच्या वेळी का दबला. अन्वय नाईक कुटुंबियांचा सवाल... विरोधी पक्षनेत्यांचा आवाज आमच्या वेळी का दबला? अन्वय ...
विरोधी पक्षनेत्यांचा आवाज आमच्या वेळी का दबला.
अन्वय नाईक कुटुंबियांचा सवाल...
विरोधी पक्षनेत्यांचा आवाज आमच्या वेळी का दबला?
अन्वय नाईक कुटुंबीयांचा सवाल; तीन वर्षे हाेऊनही न्यायाच्या प्रतीक्षेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते ज्या पद्धतीने आक्रमक झाले आहेत, सीडीआर काढत आहेत. मात्र आमच्या वेळी त्यांचा आवाज का उठला नाही. त्यावेळी ते गप्प का होते? माझ्या वडिलांनी आत्महत्या करून तीन वर्षे झाली. आम्हाला न्याय कधी मिळणार? असा सवाल अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी केला.
अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञाने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन, आरोपींच्या अटकेची मागणी केली. अक्षता यांनी केलेल्या आरोपानुसार, माझ्या पतीने आणि सासूने ५ मे २०१८ रोजी आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितीश सारडा या तिघांची नावे आहेत. त्यांना अटक न करता, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. अर्णब गोस्वामींच्या पाठीशी आधीचे सरकार होते, त्यामुळे प्रकरण बंद करण्यात आले.
आज मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते आवाज उठवत आहेत. स्वतः तपास करत सीडीआरही काढत आहेत. केवळ संशय असला तरी लगेच (मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे) बदल्या केल्या जात आहेत. कारवाई होत आहे. विधानसभा पूर्ण हादरवली जात आहे. माझ्या वडिलांच्या वेळेस या गोष्टी का झाल्या नाहीत? त्यांचे सरकार असताना आम्हाला न्याय का मिळवून दिला नाही? ते गुन्हेगार तुमचे नातेवाईक होते का? तुम्ही अंबानी असाल तरच न्याय मिळणार का? आमच्या प्रकरणात तर सुसाईड नोट आहे, मग या न्यायव्यस्थेला काय अर्थ? असा सवाल आज्ञा यांनी केला.
* सुमारे ३ वर्षांपासून आम्ही लढत आहोत!
न्यायासाठी सुमारे ३ वर्षांपासून आम्ही लढत आहोत. आम्हाला खुलेआम धमक्या देण्यात येत आहेत. सर्वाेच्च न्यायालयाने फक्त अंतरिम जामीन दिला आहे, निकाल नाही. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे, असे आज्ञा नाईक यांनी सांगितले. माझ्या पतीच्या आत्महत्येचे प्रकरण बाजूला ठेवून विरोधक त्यांच्या जमीन व्यवहारांवर चर्चा करत आहेत. जमीन खरेदी-विक्री करणे हा आमचा व्यवसाय आहे. ताे कुणासाेबत करायचा हा आमचा निर्णय आहे, असे नाईक कुटुंबीयांनी स्पष्ट केले.
................................