Join us

मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य यांना उतरण्यास का सांगितले? जाणून घ्या कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 8:38 PM

जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी शिक्रा पॉईंटवर पोहचली तेव्हा त्याठिकाणी तैनात असलेले एसपीजी सुरक्षा जवानांनी तपासणीसाठी कार थांबवली.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते मात्र या दौऱ्यात देहू येथे अजित पवारांना भाषण करू न दिल्यानं आणि मुंबईत आदित्य ठाकरेंना सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांच्या वाहनातून उतरण्यास सांगितले यामुळे वाद निर्माण झाला. देहू येथील संत तुकाराम मंदिरातील कार्यक्रम उरकल्यानंतर पंतप्रधान मोदी मुंबईच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. 

पुण्यातून खासगी विमानाने पंतप्रधान मोदी आयएएन शिक्रा येथे पोहचले. त्यावेळी मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहचले होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या गाडीत राज्याचे पर्यटन मंत्री आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. परंतु मोदींच्या स्वागतापूर्वी आदित्य ठाकरेंना सुरक्षेचा मोठा फटका बसला. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी आदित्य ठाकरेंना गाडीतून उतरण्यास सांगितले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी निघालेले आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनात बसले होते. 

जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी शिक्रा पॉईंटवर पोहचली तेव्हा त्याठिकाणी तैनात असलेले एसपीजी सुरक्षा जवानांनी तपासणीसाठी कार थांबवली. कारमध्ये आदित्य ठाकरेंना पाहता एसपीजी जवानांनी त्यांना खाली उतरण्यास सांगितले. कारण ज्या व्हिआयपी लोकांची यादी देण्यात आली होती. त्यात आदित्य ठाकरे यांचे नाव नव्हते. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने जेव्हा आदित्य ठाकरेंना पाहिले तेव्हा त्यांना खाली उतरण्यास सांगितले. एसपीजी जवानांच्या या कृत्यावर उद्धव ठाकरे संतापले. 

उद्धव ठाकरेंनी एसपीजी अधिकाऱ्यांना सुनावले की, आदित्य ठाकरे हे चिरंजीव म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यासाठी पोहचले नाहीत. तर आदित्य हे महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आहेत. त्याचसोबत राजशिष्टाचार मंत्री या नात्याने आदित्य ठाकरे प्रोटोकॉलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यासाठी जाऊ शकतात. उद्धव ठाकरेंनी घातलेल्या वादानंतर एसपीजीने आदित्य ठाकरेंना पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी आत जाण्यास परवानगी दिली. 

अजितदादांना भाषण करू न दिल्याने वादंगदेहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषणाची संधी दिली नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव पुकारले गेले. मात्र मोदींनी अजितदादांकडे इशारा करत त्यांचं भाषण का नाही? असा सवाल केला. मात्र यावरून राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवारांना भाषण करू न देणे दुर्दैवी आहे. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. कार्यक्रमात भाषणाची यादी केंद्रीय विभागाकडे पाठवली होती परंतु अजित पवारांचे नाव का वगळलं? कोत्या मनोवृत्तीची लोक राजकारणात आहेत हे वाईट आहे. पांडुरंगाचं नाव घेऊन सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं काम वारी करतं. कुणी मोठं, छोटं नसतं. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ते पक्षपात करतात हे खरोखर दुर्दैवी आहे असं त्यांनी टीका केली.  

टॅग्स :उद्धव ठाकरेआदित्य ठाकरेनरेंद्र मोदी