वैमानिकांचा सवाल; चक्रीवादळामुळे अपघात घडला असता, तर जबाबदार कोण?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे ताशी १०० किमीहून अधिक वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. असे असतानाही मुंबई विमानतळावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय उशिराने घेण्यात आला. ही बाब गंभीर असून, एखादा अपघात घडला असता, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल करीत काही वरिष्ठ वैमानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
१७ मे रोजी चक्रीवादळ मुंबईलगत धडकल्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटनाही घडल्या. इतकी भयावह स्थिती असतानाही मुंबई विमानतळ बंद करण्याचा निर्णय सकाळी ८ नंतर घेण्यात आला. वादळाची तीव्रता वाढल्याने ११ तास विमानतळ बंद ठेवावे लागले. मुंबईच्या दिशेने निघालेली सात विमाने इतरत्र उतरविण्यात आली, परंतु असा प्रसंग उद्भवण्याची वेळ येण्याआधी प्रशासनापर्यंत हवामान विभागाच्या सूचना पोहोचल्या नव्हत्या का, की सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा सवाल या वैमानिकांनी उपस्थित केला आहे.
याउलट ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन करून वादळ तीव्र होण्याआधी कोलकाता आणि ओडिशातील विमानतळे बंद करण्यात आली. ही तत्परता मुंबई आणि गुजरातच्या बाबतीतही दाखविता आली असती. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे जवळपास ५५ विमाने रद्द करावी लागली. त्यामुळे शेकडो प्रवासी विमानतळावर अडकून पडले. आदल्या दिवशी हा निर्णय घेतला असता, तर इतका बिकट प्रसंग ओढवला नसता, अशी नाराजी एका खासगी विमान कंपनीतील अधिकाऱ्याने व्यक्त केली.
दरम्यान, या संदर्भात मुंबई विमानतळाशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
* प्रवाशांची झाली रखडपट्टी
१७ मे रोजी सकाळी ८ वाजता मुंबई विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला. सुरुवातीला ४ तास, नंतर ६ तास, पुढे ८ तास आणि शेवटी ११ तासांनंतर वाहतूक सुरू करण्यात आली. तिकीट आरक्षण केलेले प्रवासी मात्र या अनिश्चिततेमुळे वेगवेगळ्या विमानतळांवर अडकून पडले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.