Join us

इम्रान खान यांना अटक का?, शिवसेनेचा कोणाला टोला; सांगितलं सुडाचं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 8:01 AM

इम्रान खान यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये अफरातफरी माजली असून इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.

मुंबई -  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (वय ७० वर्षे) यांना पॅरामिलिटरी रेंजर्सनी मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात अटक केली. रेंजर्स न्यायालयाच्या खिडकीच्या काचा, दरवाजा तोडून आत घुसले आणि थेट इम्रान खान यांना उचलले. त्यांच्या कॉलरला पकडून त्यांना गाडीत बसवले. त्यांच्या भोवती अनेक रेंजर्सचा गराडा होता. अगदी सिनेस्टाईल अटक एका देशाच्या माजी पंतप्रधानांना झाल्याने जगभरातील देशांत या घटनेची चर्चा होत आहे. केवळ भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात त्यांना अटक झाल्याचे वरकरणी दिसत असले तरी, यामागचे राजकारण मोठं आहे. शिवसेनेनं आपल्या मुखपत्रात इम्रान खान यांना नेमकी अटक का झाली, यावर भाष्य केलंय. 

इम्रान खान यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये अफरातफरी माजली असून इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी रावळपिंडी येथील लष्कर मुख्यालयावर व लाहोर येथील कॉर्प्स कमांडरच्या घरावर चाल केली. कमांडरच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली. रस्त्यावरील अनेक वाहनांची जाळपोळही त्यांनी केली. अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानपुढे आता गृहयुद्धाचे संकट उभे राहते की काय, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे. 

आपल्या राजकीय विरोधकांना वाट्टेल त्या पद्धतीने संपवणे, खोटेनाटे आरोप करून तुरुंगात डांबणे, बदनामीच्या मोहिमा उघडणे, असे भयंकर प्रकार हल्ली देशोदेशीच्या राजकारणात प्रचलित झाले आहे. अशाच राजकीय सूडनाटय़ातून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आता अटक झाली, असे शिवसेनेनं आपल्या सामना या मुखपत्रात म्हटलं आहे.  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी दुपारी ज्या पद्धतीने अटक करण्यात आली, ती संपूर्ण कारवाई म्हणजे राजकीय सूडनाटय़ाचाच एक भाग आहे व या नाटय़ाचा अंत कसा होईल, हे आज तरी कुणी सांगू शकणार नाही, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे. 

हेच इम्रान यांच्या अटकेचं खरं कारण

प्रसारमाध्यमांतून इम्रान यांच्या अटकेची जी दृश्ये समोर आली आहेत ती पाहता ही अटक आहे की अपहरण? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याचे पाकिस्तानचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत असले तरी या कारवाईमागे मोठे षड्यंत्र आहे. पाकिस्तानचे लष्कर व तेथील शरीफ सरकारने मिळून हे कारस्थान रचले व इम्रान खान यांना अटक झाली. पंतप्रधान पदावर असताना इम्रान यांनी अल-कदीर ट्रस्टच्या एका विद्यापीठाला कोटय़वधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे दिली, असा आरोप आहे. पाकिस्तानचे एक अब्जाधीश उद्योगपती मलिक रियाज यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ही अटकेची कारवाई झाली, असे वरकरणी भासवले जात असले तरी अटकेमागे हेच नेमके कारण आहे, यावर खुद्द पाकिस्तानची जनताही विश्वास ठेवणार नाही. प्रत्यक्षात इम्रान खान यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ व परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांच्या विरोधात उघडलेली आघाडी आणि लष्करी अधिकाऱ्यांवर केलेले गंभीर आरोप हेच इम्रान यांच्या अटकेचे खरे कारण आहे, असे शिवसेनेनं म्हटलं आहे. 

टॅग्स :इम्रान खानपाकिस्तानशिवसेना