मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज का झाला?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:51 PM2024-02-27T12:51:41+5:302024-02-27T12:54:50+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनोज जरांगे यांच्या विधानावरुन आक्रमक पवित्रा घेतला.
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या विषयावरुन सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनोज जरांगे यांच्या विधानावरुन आक्रमक पवित्रा घेतला.
देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले की, पोलिसांच्या लाठीचार्जमुळे आंदोलन चिघळलं असा विरोधकांचा आरोप आहे. लाठीचार्जमुळे झालं असेल, पण लाठीचार्ज का झाला, आता षडयंत्र बाहेर येतंय. आता हे लक्षात येतंय. मनोज जरांगे पाटील यांना रात्री घरातून बाहेर आणणारे कोण आहेत, त्यांना भेटणारे कोण आहेत? कुणासोबत बैठक झाली? पोलिसांवर दगडफेक करायला कुणी सांगितली?, आता यातील आरोपी सांगत आहेत. पोलीस आपले नाहीत का, आपल्या पोलिसांना मारायचे? आणि आपण गप्प राहायचं?, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थत केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोलले पाहिजे. जरांगेंच्या भाषेला, विधानाला काहीतरी राजकीय वास येतोय तेव्हा मीदेखील बोललो. मुख्यमंत्री म्हणून सर्व समाजाची जबाबदारी माझ्यावर आहे. उद्या कुणावरही हल्ले होतील त्यामुळे सरकार म्हणून आम्ही पाठिशी आहोत. सगळ्यांना सोबत घेऊन राज्याला पुढे न्यायचे आहे. जी काही वस्तुस्थिती आहे ती समोर आली पाहिजे. एसआयटीच्या चौकशीतून जे सत्य आहे ते बाहेर येईल. जे खरे ते समोर आले पाहिजे. कुणावरही सूडबुद्धीने आकसाने कारवाई केली नाही आणि करणार नाही. खालच्या पातळीवर, एकेरी भाषेत कुणी बोलू लागलं तर कुणालाही पाठिशी घालू नये. विरोधकांनी यात राजकारण आणू नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जरांगे पाटलांनी बोललेली भाषा कुणाची?- CM शिंदे
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काम करणारे होते त्यांनी पुढे आणले. कुठल्याही गोष्टी लपत नाही. दगडफेक झाली त्याचाही अहवाल समोर आला आहे. आतापर्यंत सरकार सहानुभूती ठेवली होती. जाळपोळ करायला लागले, आमदारांची घरे जाळली. मालमत्तेचे नुकसान केले. अशा परिस्थितीत सरकारने हातावर हात ठेऊन गप्प बसायचं का? प्रामाणिकपणे आंदोलन होते, तोपर्यंत मुख्यमंत्र्यापासून सगळे गेले. पण कायद्याच्या बाहेरची मागणी करणे हे योग्य आहे का? देवेंद्र फडणवीसांबाबत जे जरांगे पाटील बोलले ती भाषा कुणाची आहे? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.
देवेंद्र फडणीसांच्या कारकिर्दीत सारथी सुरु झाले- CM शिंदे
देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत सारथी सुरू झाले. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला निधी दिला. शहरी ग्रामीण भागात निर्वाह भत्ता वाढवला. मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सवलती दिली. मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे समाजासाठी आंदोलन करत होता. तेव्हा मी एकदा नव्हे दोनदा उपोषणस्थळी गेलो. एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेले असताना तिकडे गेलो. पण जरांगे पाटील यांच्याशी देणंघेणं नाही. परंतु सरकारवर टीका करणे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचीही काढली. सरकार म्हणून विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन निर्णय घेतला. फडणवीसांवर खालच्या पातळीवर आरोप केलेत. ही भाषा कार्यकर्त्यांची नाही तर राजकीय पक्षाची भाषा आहे असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.