ट्विस्ट! एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद का दिलं?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 06:19 PM2022-06-30T18:19:43+5:302022-06-30T18:21:12+5:30
आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाहीत, ही तत्त्वांची आणि हिंदुत्वाची लढाई आहे, असं भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मुंबई- राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांना भाजपाचा पाठिंबा देईल. या सरकारला माझे समर्थन असेल, अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली. त्यामुळे राज्यात एकच चर्चा सुरु झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या. मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होती आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. मात्र भाजपा एकनाथ शिंदेंच्या गटाला पाठिंबा देत सरकार स्थापन करेल, परंतु मी मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचा विधिमंडळ गट, भाजपाचा विधिमंडळ गट, १६ अपक्ष आणि लहान पक्षांचे आमदार एकत्र आले आहेत. आम्ही राज्यपालांना तसं पत्र दिले आहे. भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा द्यायचे ठरवले आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. भाजपाने हा निर्णय घेतला कारण, आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाहीत. कुठलं तरी मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी आम्ही हे करत नाही. ही तत्त्वांची आणि हिंदुत्वाची लढाई आहे. त्यामुळे भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद https://t.co/Nl3FFMlvcP
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 30, 2022
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजपानं १०५ जागा आणि शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. जवळपास १६१ युती आणि अपक्ष मिळून १७० बहुमत आमच्याकडे होते. भाजपा-शिवसेना युतीचं सरकार तयार होईल. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणा केली होती. परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि त्यांचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- एकनाथ शिंदे
जो विश्वास भाजपनं आमच्या ५० आमदारांवर दाखवलाय तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्या ५० आमदारांच्या जोरावर ही लढाई लढलोय त्यांचे आभार मानतो. ज्या ५० लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो कदापि तोडणार नाही. जो यापूर्वी त्यांना अनुभव आला तोही त्यांना येऊ देणार नाही याची खात्री करेन, असं एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याला पुढे नेण्यासाठी, विकासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.