‘चॅट बॉट’ बंद का केली, तक्रारी करायच्या कुठे? पालिकेला आदित्य ठाकरे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 12:53 PM2023-06-10T12:53:49+5:302023-06-10T12:56:56+5:30
पालिका प्रशासनाकडून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागावा आणि मुंबईकरांना कचऱ्याच्या तक्रारीची नोंद करता यावी म्हणून व्हॉट्सॲप सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आपल्या घराजवळ असलेली महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, कोरोना केंद्रे, पालिकेच्या शाळा, उद्याने, पर्यटनस्थळे, अग्निशमन केंद्रे यांसह तब्बल ८० सेवासुविधांची माहिती व लाभ मुंबईकरांना घरबसल्या मिळावी यासाठी मागील वर्षी पालिकेने ‘व्हॉट्सॲप चॅट-बॉट’ सुविधा सुरू केली आहे. याद्वारे नागरिकांना पालिकेसंबंधित कामाच्या तक्रारी वा सूचनाही करता येणार आहेत. मग त्या चॅटबॉट सुविधेचे नेमके काय झाले? महाविकास आघाडी सरकारकडून सदर सुविधा सुरू करण्यात आली होती म्हणून ती आता बंद करण्यात आली आहे का? की त्या सुविधेला मुख्यमंत्र्यांचे नाव नसल्याने ती खंडित करण्यात आली का, असा प्रश्न शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे.
पालिका प्रशासनाकडून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागावा आणि मुंबईकरांना कचऱ्याच्या तक्रारीची नोंद करता यावी म्हणून व्हॉट्सॲप सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला असून, त्याला देण्यात आलेले नाव ही मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हाॅट्सॲप हेल्पलाइन असे दिले आहे. दरम्यान, हेल्पलाइनला मुख्यमंत्र्यांचे नाव देण्याचा उद्देश काय, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पालिका प्रशासन चॅट बॉट सुविधेला मुख्यमंत्र्यांचे नाव देऊन त्यानं अंकुश करण्याचा प्रयत्न कृती असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली आहे. या शिवाय या आधीच्या हेल्पलाइनविषयी पालिकेने स्पष्टीकरण द्यावे, असेही आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.