सिनेट सदस्यांचा सवाल; मुंबई व एसएनडीटी महिला विद्यापीठाने खुलासा करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ मुंबई’ हा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या मुंबईत होणाऱ्या या जनता दरबाराच्या नियोजनात युवा सेनेचा अंमल असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे. त्यातच उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा कार्यक्रम, मग विद्यापीठ खर्च का करत आहे, असा सवाल अन्य सिनेट सदस्यांकडून विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर युवा सेना सिनेट सदस्यांनीच मुंबई विद्यापीठ व एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूंना या कार्यक्रमाच्या खर्चाची जबाबदारी नक्की कोणाची आहे, याचा खुलासा करावा, अशी मागणी पत्र लिहून केली आहे.
विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जनता दरबार व्हावा, अशी आमची इच्छा आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या कार्यकर्त्यांनीही तशी मागणी केली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, विद्यापीठे करत आहेत. त्याच्या नियोजनासाठी आम्ही मदत करत असल्याची माहिती युवा सेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. यासंदर्भात कुलगुरू सुहास पेडणेकर आणि प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.
मुक्ता संघटनेचे वैभव नरवडे यांनीही या जनता दरबाराला आक्षेप घेतला असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना या उपक्रमात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. राज्यातील इतर विद्यापीठांत झालेले उपक्रम हे विद्यापीठाच्या संकुलात आयोजित करण्यात आले होते मग याच कार्यक्रमाची वरळी मतदारसंघात एवढी उठाठेव का, असा सवालही नरवडे यांनी उपस्थित केला आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनावर साहजिकच खर्चाची जबाबदारी असल्याने यासंदर्भात ते खुलासा करणारच नाहीत, असा दावाही त्यांनी केला आहे.
* विद्यापीठांकडून आवाहन
२२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील नेहरू सेंटर येथे विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी, प्राचार्य व शैक्षणिक संस्था यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, अडचणी ऐकून घेण्यासाठी ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ मुंबई’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी मुंबई व एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर संबंधिताना आपले प्रश्न मांडता येणार आहेत. ज्यांना तक्रार ऑनलाईन सादर करता येणे शक्य नाही, त्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून निवेदन सादर करता येईल. सर्व संबंधितांनी आपला प्रतिसाद नोंदविण्याचे आवाहन विद्यापीठांकडून करण्यात आले आहे.
* विद्यापीठाला खर्च करण्याच्या सूचना नाहीत
सदर कार्यक्रमासाठी खर्च करण्याच्या कोणत्याही सूचना विद्यापीठाला नाहीत आणि कोणताही खर्च अद्याप झालेला नाही
- विद्यापीठ रजिस्टार, बळीराम गायकवाड
* चांगल्या कार्यक्रमांत नाहक विघ्न आणू नये
मुंबई विद्यापीठात होणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठ किंवा एसएनडीटी विद्यापीठ कोणताही खर्च करीत नाहीत. विरोधकांनी चांगल्या कार्यक्रमांमध्ये नाहक विघ्न आणू नयेत.
- उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री
........................
-------------------