डायलेसिसची चिंता कशाला; या ठिकाणी होईल स्वस्त दरात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 01:15 PM2023-06-07T13:15:19+5:302023-06-07T13:15:55+5:30
आधुनिक जीवनशैलीमुळे किडनीच्या विकारात झाली वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही वर्षांत आधुनिक जीवनशैलीचा अवलंब केल्याने किडनीच्या विकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काहींचा हा विकार इतका बळावला आहे की त्या रुग्णांना किडनीचे डायलेसिस करावे लागत आहे. मात्र आठवड्यातून तीनदा डायलेसिस करावे लागत असल्याने याचा खर्च खूप असतो. सरकारी रुग्णालयात तातडीची सेवा मोफत किंवा अल्पदरात पुरविली जाते. मात्र नियमित डायलेसिससाठी अनेकदा रुग्णांना सामाजिक संस्थांवर अवलंबून राहावे लागते. या ठिकाणी अल्प दरात किंवा मोफत डायलेसिसची सेवा दिली जाते.
काही रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब या विविध समस्यांनी ग्रासलेले असते. याचा दुष्परिणाम किडनीवर होऊन त्या व्यक्तीला क्रॉनिक किडनी डिसीज (सीकेडी) होऊन त्याच्या किडनीचे कार्य हळूहळू बंद पडू लागते. त्यावेळी त्या रुग्णाला किडनी डायलेलीसची गरज भासते. खासगी रुग्णालयात एका डायलेसिस सायकलचे दर १०००-१२००-१४०० रुपये या प्रमाणात आहेत. अनेकांना खासगी रुग्णालयातील दर परवडत नाहीत. किडनी विकाराचा परिणाम हा रुग्णाच्या संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतो. दैनंदिन कामे करताना अडथळे येऊ शकतात.
काही वेळा रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते. जे. जे. रुग्णालयाच्या अखत्यारीतील सेंट जॉर्जेस रुग्णालयात लवकर डायलेसिस सेंटर चालू करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
काय असू शकतात किडनी विकारांची कारणे?
किडनीवर परिणाम करणाऱ्या औषधाचे अधिक प्रमाणात सेवन, मधुमेह, लठ्ठपणा, अनुवांशिक किडनी विकार, मूत्राशय मार्गातील संसर्ग.
रुग्णांमध्ये ही लक्षणे
- झोप न लागणे
- उच्च रक्तदाब
- फुप्फुसात द्रव जमा होणे
- चेहऱ्यावर, पायावर आणि घोट्याला सूज येणे
- छाती दुखणे
- वारंवार लघवीला होणे
या ठिकाणी होते स्वस्त व मोफत डायलेसिस
सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे किडनी डायलेसीसची सुविधा सुरू केली असून, त्या ठिकणी २५० रुपये एका डायलेसिस सायकलकरिता खर्च येतो.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे त्यांच्या ठिकणी डायलेसिस सेंटर तयार करण्यात आले असून, दिवसाला ८० -९० रुग्ण या सुविधेचा लाभ घेत असून, येथे डायलेसिस पूर्णपणे मोफत दरात केले जाते.
नाना पालकर स्मृती समितीतर्फे परळ केंद्रावर दिवसाला ४२ रुग्ण लाभ घेत असून, या ठिकाणी कोणतेही मूल्य आकारले जात नाही. त्याचप्रमाणे सांताक्रूझ केंद्रावर रोज ३६ रुग्णांना मोफत डायलेसिसची सुविधा दिली जाते; तर बोरिवली केंद्रात रोज २४ डायलेसिस करून घेतात. मात्र त्यासाठी त्यांना ३५० रुपये आकारले जातात.
आमच्याकडे रुग्णालयात रुग्ण विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी दाखल होतात. त्यावेळी जर गरज लागली तर आमच्याकडे डायलेसिसची सेवा दिली जाते. काही रुग्णांना किडनी विकाराचा त्रास असतो. मात्र ते दुसऱ्या आजारासाठी दाखल होतात. या अशावेळी त्यांना गरजेनुसार डायलेसिस दिले जाते. काहीवेळा तात्पुरत्या डायलेसिसची गरज रुग्णांना लागते. त्यावेळी आम्ही ही सुविधा देतो. तत्काळ स्वरूपातील ही सेवा आहे. ही सेवा अनेकदा शासनाच्या योजनेमधून मोफत दिली जाते, रुग्ण जर त्या योजनेत बसत नसेल तर शासकीय दर आकारून ही सुविधा दिली जाते. मात्र नियमित डायलेसिसच्या रुग्णांना ही सुविधा दिली जात नाही. - डॉ. गीता सेठ, किडनीविकार तज्ज्ञ, सर जे जे रुग्णालय.