लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बारावीनंतर दहावीचाही निकाल लागला आहे. काहींना खूप चांगले गुण पडले असून, काही काठावर पास झाले आहेत. तर काही अनुत्तीर्ण झाले आहेत. दहावी, बारावीत अनुत्तीर्ण झाले म्हणजे करिअर संपले, असे अजिबात नाही. असे अनेक कोर्सेस आहेत की, ते पूर्ण केल्यानंतर नोकरीची किंवा स्वत:चा व्यवसाय करण्याची संधी मिळते. त्यामुळे हिंमत न हारता आणि चिंता न करता पुन्हा एकदा नव्या दमाने सुरुवात करायला हवी, असे मत शिक्षणतज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावी करिअरला दिशा देणारे असते. काही मुलांना मात्र या परीक्षांमध्ये प्रथम प्रयत्नात अपयश येते. त्यानंतर विद्यार्थ्यांना तयारी करून पुन्हा परीक्षा देण्याची संधी असते. परीक्षेची तयारी करत असताना वर्षे वाया जाऊ नये, यासाठी हे विद्यार्थी वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्सेस करू शकतात. अगदी सहा महिन्यांचेही काही कोर्स आहेत, ते व्यावसायिक कौशल्य प्राप्त होते.
कॉम्प्युटर कोर्सचे अपडेटेड क्षेत्र
दहावीनंतर कॉम्प्युटरचे अनेक कोर्स उपलब्ध आहेत. असे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक खासगी संस्था कार्यरत आहेत. यात कॉम्प्युटर मेंटेनन्स, व्हिडीओ एडिटिंग, डिझाइन, एचटीएमएल, मोबाइल दुरुस्ती कोर्स, नेटवर्किंग आणि हार्डवेअर आदी कोर्सचा समावेश आहे.
या संधीही उपलब्ध
वायरमन, प्लंबर ऑफ अप्लायन्सेस, टीव्ही रिपेअरिंग, नर्सरी डेव्हलपमेंट, कमर्शियल आर्टिस्ट, पोल्ट्री मॅनेजमेंट, टाइल लेअर, कारपेंटर, ब्रीक लेअर, पेस्ट कंट्रोल, पॅकिंग, किचन गार्डनिंग, सेक्रेटरियल प्रॅक्टिस, पब्लिक स्पीकिंग, फ्लॉवर मेकिंग.
पुरवणी परीक्षेची तयारी करा
बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची संधी आहे. परीक्षेसाठी २९ मेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ९ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना निमयित शुल्क भरून हे ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत. पुरवणी परीक्षा ही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात होऊ शकते.
हा पर्यायही खुला
दहावी, बारावी अनुत्तीर्ण झाल्यानंतरही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. येथून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक क्षेत्रांत करिअर करण्याची संधी येथून मिळते.