Join us

मुंबईतील १५ रेल्वे स्थानकांवर वाय-फाय

By admin | Published: May 12, 2016 1:59 AM

जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाईलवर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे देशभरातील रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा पुरविण्यात येत आहे

मुंबई : जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाईलवर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे देशभरातील रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा पुरविण्यात येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील मुंबई सेन्ट्रल स्थानकात वायफाय सेवा सुरु केल्यानंतर आता आणखी पंधरा स्थानकात ही सेवा सुरु केली जाणार आहे. येत्या तीन ते चार महिन्यात वायफाय सुविधा सुरु होईल. या पंधरा स्थानकांवर सुरु होणारी वायफाय सुविधा ही सुरुवातीच्या अर्धा तासांसाठी मोफत असणार आहे. भारतातील व्यस्त अशा रेल्वे स्थानकांवर गुगलमार्फत वायफाय सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्याचा निणंय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. सुरुवातीला २0१६ पर्यंत १00 स्थानकांवर वायफाय देण्यात येईल आणि त्यानंतर २0१८ पर्यंत एकूण ४00 स्थानकांवर वायफाय सेवा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी स्थानकात येणाऱ्या १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांना त्याचा फायदा मिळेल. मुंबईतील रेल्वे स्थानकांपैकी मुंबई सेन्ट्रल स्थानकात वायफाय सुविधा २0१६ च्या जानेवारी महिन्यात सुरु करण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. यानंतर मुंबईतील १५ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा येत्या तीन ते चार महिन्यात सुरु केली जाणार आहे. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट, दादर, वान्द्रे (लोकल) स्थानक, वान्द्रे टर्मिनस, अंधेरी, बोरीवली तर मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा, दादर, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे,कल्याण,वाशी, बेलापूर स्थानकाचा समावेश असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मुंबई सेंट्रल स्थानकात सुरू झालेली वाय-फाय सुविधा पहिल्या अर्धा तासासाठी मोफत आहे. त्यानंतर वाय-फायचा वापर करताच त्याची सेवा खंडित होत आहे आणि त्याला पुन्हा लॉगिन करावे लागत आहे. अशीच सुविधा अन्य १५ स्थानकांवरही असणार आहे.