Join us

मुंबई सेंट्रल टर्मिनसवर वायफाय

By admin | Published: September 29, 2015 3:15 AM

प्रवाशांना विनाअडथळा, जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी यासाठी सोयीची ठरणारी वायफाय सेवा आता मुंबई सेंट्रल टर्मिनसवरही उपलब्ध होणार आहे.

मुंबई : प्रवाशांना विनाअडथळा, जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी यासाठी सोयीची ठरणारी वायफाय सेवा आता मुंबई सेंट्रल टर्मिनसवरही उपलब्ध होणार आहे. देशातील ५00 स्टेशन्सवर गुगलच्या साहाय्याने वायफाय सेवा देण्यात येणार असून, यात वायफाय सेवेचा पहिला मान मुंबई सेंट्रल टर्मिनसला मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत वायफाय सेवा मुंबई सेंट्रल टर्मिनसवर उपलब्ध होईल, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. अमेरिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅलिफॉर्नियातील गुगलच्या मुख्यालयाला भेट दिली; तसेच गुगलचे नवे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी चर्चाही केली. यात मोदींच्या डिजिटल इंडियाच्या योजनेनुसार भारतात ५00 स्थानकांवर उच्च दर्जाची वायफाय सेवा सुरू करणार असल्याची घोषणा पिचाई यांनी केली. सर्वांत व्यस्त अशा रेल्वेच्या १00 स्थानकांवर पुढील वर्षापर्यंत वायफाय सेवा सुरू होईल, असेही ते म्हणाले. याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले की, वायफाय सुविधा नोव्हेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत येईल आणि ती उच्च दर्जाची असेल. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल टर्मिनसला हा मान मिळालेला असतानाच मध्य रेल्वेवरील ५ स्थानकांचाही यात समावेश आहे. सीएसटीवर सध्या वायफायची चाचणी सुरू असून, त्याचबरोबर दादर, एलटीटी, ठाणे आणि पुणे टर्मिनसवरही गुगलच्या साहाय्याने वायफाय सुविधा देणार असल्याचे मध्य रेल्वेवरील मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.