Join us  

मुंबई सेंट्रलमध्ये आजपासून वाय-फाय

By admin | Published: January 22, 2016 3:20 AM

प्रवाशांना विनाअडथळा, जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी, यासाठी सोईची ठरणारी वाय-फाय सेवा मुंबई सेंट्रल स्थानकात २२ जानेवारीपासून सुरू होत आहे.

मुंबई : प्रवाशांना विनाअडथळा, जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी, यासाठी सोईची ठरणारी वाय-फाय सेवा मुंबई सेंट्रल स्थानकात २२ जानेवारीपासून सुरू होत आहे. या सेवेचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. देशातील ५00 स्टेशनवर गुगलच्या सहाय्याने वाय-फाय सेवा देण्यात येणार असून, यात वाय-फाय सेवेचा पहिला मान मुंबई सेंट्रल टर्मिनसला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी कॅलिफोर्नियातील गुगलच्या मुख्यालयाला भेट दिली होती आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी चर्चाही केली. या वेळी पिचाई यांनी डिजिटल इंडियाच्या योजनेनुसार भारतातील ५00 स्थानकांवर उच्च दर्जाची वाय-फाय सेवा सुरूकरणार असल्याची घोषणा केली होती. यात सुरुवातीला सर्वात व्यस्त अशा रेल्वेच्या १00 स्थानकांवर वाय-फाय सेवा सुरू करतानाच त्याचा पहिला मान मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्यात आला होता. त्यानुसार ही वाय-फाय सेवा २२ जानेवारीपासून कार्यान्वित केली जाणार आहे. या सेवेची चाचणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ही चाचणी यशस्वी झाल्याचे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.