लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरात गर्भपाताच्या गोळ्यांची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या आरोपींसह अन्य अमली पदार्थ विकणाऱ्या सात जणांवर अमली पदार्थ विरोधी कक्षाने कारवाई केली आहे. ज्यात दोन वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) यांचाही समावेश आहे. अद्याप ४३ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या अमली पदार्थासह ३.५ लाख रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.
२ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०२३ रोजीपर्यंत गुन्हे शाखेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिट आणि घाटकोपर युनिट यांनी मुंबई शहरात अमली पदार्थ विरोधी कारवाई अंतर्गत कांदिवली, साकीनाका, घाटकोपर, माझगाव या ठिकाणी विविध ठिकाणी छापे टाकले. त्यात ४ हजार ३०० कोडेन मिश्रित कफ सिरप बॉटल्स, १ हजार २७५ अल्फाझोलम - नायट्रावेट टॅबलेट आझाद मैदान युनिटने कांदिवली आणि साकीनाका परिसरातून ताब्यात घेतले.
ज्याची किंमत जवळपास १९ लाख ४७ हजार ५०० रुपये असून पाच जणांविरुद्ध कारवाई केली. तर १२० ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी) ताब्यात घेतला ज्याची किंमत अंदाजे २४ लाख रुपये असून यात दोघांना अटक करत त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली.
२३ कोटींचे ड्रग्ज जप्त...अमली पदार्थ विरोधी कक्षाने २०२३ मध्ये कोडेन मिश्रित कफ सिरपची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या एकूण १७ आरोपींविरुद्ध कारवाई केली. त्यांच्या ताब्यातून १ हजार १९१ किलो वजनाचा अमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच मेफेड्रॉन या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एकूण ९८ तस्करांविरुद्ध कारवाई करत त्यांच्याविरुद्ध ४९ गुन्हे दाखल केले असून त्यांच्या ताब्यातून २२.८२ कोटी रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे.