प्लास्टिक कॅरीबॅगचा पुन्हा सर्रास वापर, महापालिकांची कारवाई थंडावली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 07:58 AM2020-12-11T07:58:23+5:302020-12-11T07:59:21+5:30

Plastic ban : राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू झाला, त्यानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग वापरावर प्रतिबंध करण्यात आला. मात्र, या निर्णयाचा विसर राज्यातील महापालिका प्रशासनांना पडल्याचे चित्र आहे.  

The widespread use of plastic carrybags has cooled municipal action | प्लास्टिक कॅरीबॅगचा पुन्हा सर्रास वापर, महापालिकांची कारवाई थंडावली

प्लास्टिक कॅरीबॅगचा पुन्हा सर्रास वापर, महापालिकांची कारवाई थंडावली

googlenewsNext

मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू झाला, त्यानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग वापरावर प्रतिबंध करण्यात आला. मात्र, या निर्णयाचा विसर राज्यातील महापालिका प्रशासनांना पडल्याचे चित्र आहे.  
राज्यभरात सर्रास प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. राज्यातील प्रमुख ८ महापालिकांच्या कार्यक्षेत्रातील पाहणीत प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नाममात्र कारवाई केल्याचे स्पष्ट झाले.  

मुंबईत कारवाईत शिथिलता   
 मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत आजही प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत असून, सुरुवातीच्या तुलनेत आता मुंबई महापालिकेकडून त्यावर कारवाईचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांनादेखील याचा धाक राहिलेला नाही. परिणामी आजघडीला मुंबईच्या बाजारपेठा, रेल्वे आणि बसस्थानक परिसर, फेरीवाले, दुकानदार, व्यापाऱ्यांकडून राजरोसपणे प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. 
मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली तेव्हा आयुक्तांनी सुमारे ५८ पेक्षा जास्त लोक कारवाईसाठी नेमले होते. त्यांना गणवेश आणि ओळखपत्रही देण्यात आले होते. सुरुवातीच्या टप्प्यात कठोर अंमलबजावणी झाली. मात्र, आता त्यात शिथीलता आली आहे. 

नवी मुंबई महापालिका
नवी मुंबईत लॉकडाऊननंतर पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला असून शहरातील फेरीवाले, मासळी मार्केट, बाजार समिती परिसर, भाजी मंडई, दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरु आहे. १ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या दरम्यान प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या २६ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  

ठाणे महापालिका
२०१९-२० मध्ये २,१६८ किलो प्लास्टिक जप्त करून ४.९० लाखांचा दंड वसूल केला होता. 
यामध्ये २६८ टन प्लास्टिक सोसायटींकडून जप्त केले होते. तर २०२०-२१ मध्ये २६५ किलो प्लास्टिक आतापर्यंत जप्त केले.
यातील ८६ टन प्लास्टिक सोसायट्यांमधून जप्त करून १५ लाखांचा दंड वसूल केला आहे.  

पुणे ३.७६ काेटी दंड वसूल  
पुण्यात छोटे व्यापारी म्हणजेच फळ, भाजीपाला, वडापाव अन्य खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर होत असल्याचे दिसून आले. पुणे महापालिकेकडून १ एप्रिल २०१९ पासून ९ डिसेंबर २०२० पर्यंत शहरातून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या १३ हजार ८९५ किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत. तर ३ हजार ९०७ जणांवर दंडात्मक कारवाई करून ३ कोटी ७६ लाख २ हजार ७४० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

औरंगाबाद गुजरातमधून येतो माल   
शहरात चोरट्या मार्गाने लाखो रुपयांच्या कॅरीबॅग दाखल होत आहेत. छावणी आणि वाळूज येथे कॅरीबॅग साठवून ठेवण्यात येतात. तेथून दुचाकी वाहनांद्वारे शहरात वाटपाचे काम केले जाते. आतापर्यंत किमान पाचशे ते सहाशे व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली असून ३० लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला. कॅरीबॅगचा साठा सापडलेल्या दोन व्यापाऱ्यांवर आतापर्यंत फौजदारी गुन्हे दाखल झाले.  

नागपूर ३१ टन प्लास्टिक जप्त
नागपुरात चोरट्या मार्गाने प्लास्टिक कॅरीबॅगचा पुरवठा व विक्री सुरू आहे. महापालिकेने गेल्या दोन वर्षांत संपूर्ण शहरात २०४८ जणांवर कारवाई केली. यामध्ये ३१ टन ९१४ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच १ कोटी ६ लाख ९५ हजार ३०० रूपये दंड वसूल केला.  

रोजच आढळतोय प्लास्टिक कचरा
शहरात दररोजच प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात आढळत आहे. शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक येते कुठून, याचे शोध घेण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या एकाच महिन्यात महापालिकेने ५६ जणांवर कारवाई करून २ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात बहुतांशी सर्वच व्यापारी आणि होलसेलर आहेत.   

कॅरीबॅगचा पुरवठा कुठून होतो?
ठाणे महापालिका हद्दीत मुलुंड, भांडुप तसेच उल्हासनगर भागातून या प्लास्टिकच्या पिशव्या येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांची ज्या ठिकाणाहून निर्मिती होते त्या ठिकाणीच कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु, ती होताना दिसत नाही. विशेष म्हणजे या भागातील झोपडपट्टी भागात याचे कारखाने सुरू आहेत. 

Web Title: The widespread use of plastic carrybags has cooled municipal action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.