पतीच्या ‘चॅटिंग’ला कंटाळून पत्नीने सोडले घर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 06:09 AM2017-11-07T06:09:18+5:302017-11-07T06:09:24+5:30
लग्न झाल्यापासून रात्रंदिवस मोबाइलवरून चॅटिंग करण्याच्या पतीच्या सवयीमुळे, पत्नीने चक्क घर सोडल्याचा प्रकार चेंबूरमध्ये उघडकीस आला.
मुंबई : लग्न झाल्यापासून रात्रंदिवस मोबाइलवरून चॅटिंग करण्याच्या पतीच्या सवयीमुळे, पत्नीने चक्क घर सोडल्याचा प्रकार चेंबूरमध्ये उघडकीस आला. ती एवढ्यावरच न थांबता यातून झालेल्या मानसिक, तसेच शारीरिक छळाविरुद्ध तिने पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून आर. सी. एफ. पोलिसांनी पतीसह सासू-सासºयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चेंबूर परिसरात तक्रारदार श्वेता बिजॉय सोलगामा (२४) पती आणि सासू-सासरे यांच्यासोबत राहाते. फेब्रुवारी २०१५ मध्ये तिचा विवाह झाला. लग्न झाल्यापासूनच बिजॉय रात्रंदिवस मोबाइलवरून कुणासोबत तरी चॅटिंग करत असल्याचे तिच्या लक्षात आले. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, हे चॅटिंग रात्री-अपरात्रीही सुरू झाल्याने, श्वेताने याचा जाब त्याच्याकडे विचारला. तेव्हा बिजॉयने तिला मारहाण करत घरातून हाकलून देण्याची धमकी दिली.
बिजॉयच्या चॅटिंगच्या सवयीमुळे श्वेताचा मानसिक तणाव वाढत होता. सासू-सासरेही त्याला काहीच बोलत नव्हते. त्याच्या या वाढत्या चॅटिंगमुळे तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. पतीच्या चॅटिंगमुळे झालेल्या मानसिक, तसेच शारीरिक छळाप्रकरणी तिने थेट आर. सी. एफ. पोलिसांत तक्रार दिली आणि तेथून थेट माहेर गाठले. तिच्या तक्रारीवरून पतीसह सासू-सासºयाविरुद्ध सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आर. सी. एफ. पोलिसांनी दिली.