Join us

घरच्या विरोधानंतरही किडनी देऊन पत्नीला जीवनदान

By admin | Published: July 17, 2014 1:12 AM

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर गावामध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेला किडनीचा आजार झाला. किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नाही,

पूजा दामले ल्ल मुंबई उत्तर प्रदेशच्या गोरखपूर गावामध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेला किडनीचा आजार झाला. किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. माहेर अथवा सासरच्या लोकांपैकी कोणीही किडनी द्यायला तयार नाही. पती तयार असूनही घरच्यांचा विरोध. मात्र कोणत्याही परिस्थितीत पत्नीचा जीव वाचवायचा, असा निर्धार पतीने केला. याचे फलित म्हणजे पत्नीवर १० जुलै रोजी मुंबईत किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. गोरखपूर येथे राहणारे शकील अहमद खान (३३) यांचा स्वत:चा लोखंडाच्या वस्तूंचा व्यवसाय आहे. अडीच वर्षांपूर्वी शकील यांचा विवाह नहिदा हिच्याशी झाला. सुखाने सुरू असलेल्या संसाराला ग्रहण लागले. लग्नानंतर आठ महिन्यांनंतर माझ्या पत्नीची प्रकृती बिघडली. किडनीचा शेवटच्या पायरीवरचा आजार झाल्याचे निदान झाले. तेव्हा किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नाही, असे सांगण्यात आले. या वेळी माहेरची मंडळी मला किडनी देतील, असा विश्वास नहिदाला वाटत होता. मात्र कोणीही पुढे आले नाही. शकील यांनी मीच तुला किडनी देणार, असे तिला सांगितले. उपचाराच्या खर्चासाठी गावचे जुने घर जिथे माझा व्यवसाय सुरू होता ते विकले. मी पत्नीला सोडावे आणि दुसरे लग्न करावे, असे घरच्यांचे म्हणणे होते, मात्र तरीही मी माझा निर्णय बदलला नाही, असे शकील यांनी सांगितले. उपचार घेण्यासाठी मुंबईत यावे लागते म्हणून शकील यांनी मालाड येथे भाड्याने घर घेतले आहे. दिल्ली, कोलकाता येथे उपचार घेऊन शेवटी १९ जानेवारी २०१३ रोजी नहिदाला उपचारासाठी परेलच्या ग्लोबल रुग्णालयात आणले. तेव्हा तिची प्रकृती खालावली होती. तिला डायलिसिस सुरू करण्यात आले. डायलिसिसमुळे तिला अजून एक व्याधी जडली. मात्र त्यातून ती बाहेर पडली. किडनीदात्याच्या घरच्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणे शक्य नव्हते. मात्र पत्नीचा जीव वाचवण्यासाठी पतीची चाललेली धावपळ, धडपड पाहून प्रत्यारोपण समितीकडून विशेष केस म्हणून या प्रत्यारोपणासाठी परवानगी मागितली. रुग्णालय आणि राज्याच्या समितीने मान्यता दिली. यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता दोघांची प्रकृती सुधारलेली आहे. यापुढे त्यांना त्रास होणार नाही, असे ग्लोबल रुग्णालयाचे नेफ्रॉलॉजी विभागाचे डॉ. भरत शहा यांनी सांगितले.