CM Uddhav Thackeray : 'पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी लढतोय, तरीही हा माणूस धीरोदात्तपणे महाराष्ट्र सांभाळतोय'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 11:24 AM2021-04-03T11:24:37+5:302021-04-03T11:29:20+5:30
CM Uddhav Thackeray : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
मुंबई - राज्यातील वाढती रुग्णसंख्या, कोरोनाला रोखण्यात अपयश आलेलं महाविकास आघाडी सरकार आणि पुन्हा लॉकडाऊनच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे राज्यातील विरोधकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांनापर्यंत, उद्योजकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत आणि फेसबुकपासून ट्विटपर्यंत सर्वत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक पोस्ट लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्याला सलाम केलाय.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला. त्यानंतर, भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. तर, इतरही विरोधकांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड खंबीर पाठीराखे बनून उभारले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले. तसेच, तुमचं वजन वापरुन, केंद्राकडून राज्याचे पैसे आणावे, असा खोचक टोलाही लगावला. त्यानंतर, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्याचं आव्हाड यांनी कौतुक केलंय.
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरोदात्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत..
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2021
त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरोदात्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टिका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत... त्यास सलाम ! सलाम !! सलाम !!!, असे भावनिक ट्विट आव्हाडांनी केलंय.
रश्मी ठाकरे रुग्णालयात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना(Rashmi Thakceray) काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, सध्या रश्मी ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एकीकडे रश्मी ठाकरे रुग्णालयात आहेत, तर दुसरीकडे आदित्य यांनाही कोरोनाची बाधा झालीय.
मुख्यमंत्र्यांच्या ह्रदयात स्टोन्स
उद्धव ठाकरे यांची दोनवेळा एन्जिओप्लास्टी झाली आहे. त्यामुळे ते आपल्या प्रकृती विषयी पूर्वीपासूनच जागरूक आहेत. ते नियमित व्यायाम करतात. डॉक्टरांच्या सतत संपर्कात असतात. तर, त्यांच्या ह्रदयात अनेक स्टोन्स असतानाही ते ज्या धीरोदात्तपणे महाराष्ट्र सांभाळतायंत, यावरुन आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंना सलाम केला आहे.