वादातून पत्नीची हत्या, भावावरही जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 02:11 PM2023-12-31T14:11:50+5:302023-12-31T14:12:15+5:30
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे...
मुंबई : बंगला विकण्याच्या वादात ४० वर्षीय व्यक्तीने पत्नीची फ्लाॅवरपॉटने हत्या करून भावावरही जीवघेणा हल्ला करून पळ काढला. चित्रा डिसा (३५) असे मृत महिलेचे नाव आहे, तर डेमियन डिसा (४५) असे जखमी दिराचे नाव आहे. घटनेनंतर आरोपीने पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
डिसाच्या घरी घरकामासाठी मोलकरीण आली. तिने दरवाजा ठोठावला. पण, कोणी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने डेमियनची पत्नी बिंदू हिला फोन करून सांगितले. बिंदूने तिच्याकडील चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तिने खिडकीतून डोकावले असता, डॅनियल जखमी अवस्थेत दिसला. पोलिसांना माहिती देत सुरक्षा रक्षकाच्या मदतीने दरवाजा तोडला आणि दोघांना रुग्णालयात नेले. चित्रा हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर डॅनियलवर उपचार सुरू आहेत.
आवाज ऐकला, पण मदतीला नाही गेले
डेमियनला मधुमेह असून, त्याची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने उपचारासाठी येणाऱ्या खर्चासाठी त्याला राहते, वडिलोपार्जित घर विकून वाटणी करायची होती. पण, ड्रायसन यासाठी तयार नसल्याने त्यांच्यात भांडण व्हायचे. चित्राही घर विकण्यासाठी पतीची समजूत काढल्याने ड्रायसन तिच्याशीही भांडायचा. शेजाऱ्यांसाठी ही भांडणे रोजचीच झाल्याने नेहमी त्यांच्या घरात जोरात किंचाळण्याचा आवाज यायचा. शुक्रवारीदेखील नेहमीसारखी भांडण सुरू असेल, असे वाटल्याने कोणी मध्यस्थी करायला गेले नाही आणि हा प्रकार घडला.