मुंबई - आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातील वादाचा कलगीतुरा अवघ्या महाराष्ट्राला माहितीय. राणेंवर खरमरीत टीका करायला शिवसेना विसरत नाही, अन् शिवसेनेचे वाभाडे काढायला नितेश राणे नेहमीच तयार असतात. आता, नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा त्यांच्याच भाषेत समाचार घेतला आहे. असंख्य नवरे बोलत असतील, बायको शिवसेनेसारखीच पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही, अशा शब्दात नितेश राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
शिवसेना आणि राणेपुत्र आमदार नितेश राणे यांच्यातील वाद नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा, नितेश राणेंनी शिवसेनेच्या सत्तेतील सहभागावरुन सेनेला टार्गेट केलं आहे. असंख्य नवरे बोलत असतील.. बायको शिवसेनेसारखी पाहिजे!! लफडी कळली तरी सोडत नाही.. जास्तच जास्त तर काय.. एक सामन्यातून अग्रलेख!!बाकी संसार सुरु!! असं ट्विट करुन नितेश राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे.
दरम्यान, आजच्या सामनातील अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भाजपावर तोंडसुख घेतले होते. अहमदनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने हिसकावून घेतला. त्यामुळे तीळपापड झालेल्या शिवसेना नेतृत्वाने आज सामनामधील अग्रलेखामधून भाजपावर कठोर शब्दांत टीका केली. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील लफडे जुनेच आहे. आता, नगरमध्ये ते पुन्हा उफाळून आले आणि भाजपला तेथे महापौर-उपमहापौरपदाची प्राप्ती झाली, असा घणाघात सामनामधून भाजपावर करण्यात आला आहे. नितेश राणेंनी सामनातील या अग्रलेखाचा दाखल देत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं. बायको असावी तर शिवसेनेसारखीच.... असं ट्विट राणेंनी केलंय.