Join us

जादूटोणा करत पत्नीने पळविले दोन किलो सोने; पती पोलिसांत मेहुणी, मेहुण्याविरोधात पोलिसांत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 8:47 AM

पतीची पोलिसांत तक्रार, तिघांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पत्नीनेच मेहुणी आणि मेव्हण्याच्या मदतीने भोंदूबाबाची जडीबुटी खाण्यास भाग पाडून वेडे ठरवत हत्येचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर, संयुक्त बँक खात्यातील लॉकरमधील दोन किलो सोने आणि घरातील १५ लाखांच्या रोकडवर डल्ला मारल्याचा आरोप करत पतीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. 

दादर परिसरात तक्रारदार ५६ वर्षीय व्यावसायिक राहण्यास आहे. तक्रारीनुसार, २०१८ ते २०२० पर्यंत वडाळा येथील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. पत्नीने धमकावत जेवणातून ढोंगीबाबाने दिलेली जडीबुटी टाकून वेडे होण्याची परिस्थिती निर्माण केली. याच औषधांद्वारे हत्येचा प्रयत्न झाला. ही बाब लक्षात येताच त्यांनी जाब विचारला तेव्हा, पत्नीसह मेहुणी आणि मेव्हण्यानेही जीवे मारण्याची धमकी दिली.  पुढे, पत्नीने संयुक्त बँक खात्यातील २ किलो सोने काढून घेतले. तसेच, घरातील १५ लाखांची रोकडही हळूहळू चोरी करून मेहुणीला दिल्याचा आरोप करत त्यांनी भोईवाडा न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा नोंदवत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. त्यानुसार, पोलिसांनी शनिवारी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. संबंधित बँक खात्यातील सोने आणि रकमेबाबत पोलिस चौकशी करत आहे. पतीची प्रकृती सध्या स्थिर आहे. या प्रकरणाची सखोल तपास केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

अद्याप अटक नाही... याप्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसून अधिक तपास सुरू असल्याचे आरएके मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव निंबाळकर यांनी सांगितले आहे.

टॅग्स :धोकेबाजी