पत्नीच्या नशेच्या व्यसनाला कंटाळून हत्या, पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 06:40 AM2019-09-07T06:40:22+5:302019-09-07T06:40:29+5:30
पतीला अटक : मानखुर्द हत्या प्रकरणाचा १२ तासांत उलगडा
मुंबई : सायन-ट्रॉम्बे रोड परिसरात रस्त्याकडेला सापडलेल्या महिलेचा मृतदेहाची ओळख पटवत अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात गुन्हेशाखेला यश आले आहे. पत्नीच्या नशेच्या व्यसनाला कंटाळून पतीनेच रागाच्या भरात डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. गुन्हे शाखेने आरोपी पती मोहम्मंद खलील मोहंमद जलील सलमानी (३३) याला अटक केली आहे
गुरुवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. घटनेची वर्दी लागताच मानखुर्द पोलीस तेथे दाखल झाले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून, याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. भररस्त्यात घडलेल्या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे.
पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्त्वाखाली कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण, तपास अधिकारी चंद्रकांत दळवी, महेंद्र घाग, योगेश लामखडे, संजय भोसले, सुरेश पवार, रमेश जाधव यांच्यासह अंमलदार यांनी तपास सुरु केला.
सुरुवातीला महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. पोलिसांनी स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीने महिलेचे फोटो सगळीकडे पाठविले. मानखुर्द, शिवाजी नगर, गोवंडी, सायन ट्रॉम्बे परिसरत पिंजून काढला. तपासात महिलेचे नाव नूर बेगम असल्याचे समजले. पोलीस तिच्या घरापर्यंत पोहचले. पती सलमानी आणि दोन मुलांसोबत ती बैगनवाडी परिसरात राहयची. पोलिसांनी पतीकडे चौकशी केली. मात्र, त्यानेही याबाबत अनभिज्ञ असल्याचा आव आणला. पोलिसांनी नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत, आदल्या रात्री दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी सलमानी हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजताच गुन्हे शाखेने त्याला पुन्हा ताब्यात घेत त्याच्याकडे उलटतपासणी सुरु केली. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या म्हणण्यानुसार, नूरला नशेचे व्यसन होते. यातूनच दोघांमध्ये भांडण होते. सलमानीचे सलून आहे. बुधवारी रात्री देखील दोघांमध्ये वाद झाले. रागातच ते रस्त्यावर आले. तेथून रिक्षा पकडली. रिक्षामध्ये पुन्हा वाद चिघळताच ते मानखुर्द परिसरात उतरले.