वेगळा रक्तगट असूनही किडनी ट्रान्सप्लांट
मुंबई : महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी भिन्न रक्त गटातील व्यक्तींच्या किडनी ट्रान्सप्लांट विषयक वैद्यकीय उपचार बाबी अंमलात आणत २ मार्च रोजी सलग ४ तास किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रुग्णालयातच केली होती. शस्त्रक्रियेदरम्यान पत्नीची एक किडनी काढून ती पतीला प्रत्यारोपित करण्यात आली. विसंगत रक्तगट असूनही किडनी ट्रान्सप्लांट करण्याची ही पहिलीच शस्त्रक्रिया होती; आणि आता ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे.अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये सुरुवातीचे ६ महिने अत्यंत काळजी घ्यावी लागते. ही शस्त्रक्रिया होऊन आता ८ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असल्याचे आता म्हणता येईल, असे नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले असून, जवळच्या नात्यात रक्तगट विसंगत असूनही किडनी ट्रान्सप्लांट करणे आता शक्य असल्याने अनेक गरजूंना आशेचा एक नवा किरण दिसला आहे. ही शस्त्रक्रिया करणाऱ्या चमूमध्ये मूत्रपिंड रोग उपचार विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. कल्पना एस मेहता, मूत्रपिंड शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एच. आर. पाठक, भूलशास्त्र विभागातील प्रा. डॉ. लिपीका बलिअरसिंग यांचा समावेश होता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ओ पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या एक चाळीस वर्षाच्या व्यक्तीला किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज होती. रुग्णाच्या पत्नीला तिची एक किडनी पतीला देण्याची इच्छा होती. मात्र, रक्तगट समान नसल्याने पत्नीची किडनी पतीला प्रत्यारोपित करण्यात अडचणी होत्या.