मनोहर कुंभेजकर मुंबई : अंधेरी पश्चिम येथील स्टेशनलगत ११३ बेड असलेल्या ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर (बीएसईएस हॉस्पिटल) यांच्याकडे विशेष म्हणजे नर्सिंग लायसन्सच नाही, तरी येथे २००२ पासून बेकायदा शस्त्रक्रिया होत असल्याचा धक्कादायक ठपका शासनाच्या महिला व बालकांचे हक्क कल्याण समितीने ठेवला असून, येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत पावलेल्या पती मंदार वेलणकरच्या न्यायासाठी गेली २० महिने त्यांची पत्नी मीनाक्षी संघर्ष करीत आहे.
कांदिवली येथे राहणाऱ्या दिवंगत मंदार वेलणकर यांच्या मृत्यूस अंधेरी पश्चिम येथील पालिकेच्या अखत्यारीत असलेले ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच (बीएसईएस हॉस्पिटल) जबाबदार असल्याचा ठपका शासनाच्या महिला व बालकांचे हक्क कल्याण समितीच्या २०१८-१९ च्या अहवालात ठेवला आहे. समितीच्या अध्यक्षा व आमदार भारती लव्हेकर यांनी हा अहवाल शासनाला अलीकडेच सादर केला आहे. लव्हेकर यांच्यासह एकूण १५ सदस्यीय समितीने या हॉस्पिटला भेट देऊन त्यांचा ३०४ पानी अहवाल तयारकेला.
मंदार वेलणकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित रुग्णालयाचे डॉक्टर अशोक मेहता, डॉ. शशांक जोशी आणि संचालक वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. मीनाक्षी वेलणकर यांना नुकसानभरपाई म्हणून ब्रह्मकुमारी रुग्णालयाकडून ठरावीक रोख रक्कम व त्यात त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्च तसेच मीनाक्षी यांना महापालिकेच्या सेवेत एक विशेष बाब म्हणून नोकरी द्यावी. याबाबत पालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी समितीने आग्रहाची शिफारस केली आहे. त्या कार्यवाहीचा अहवाल विधान मंडळास एका महिन्याच्या आत सादर करण्यात यावा, अशी शिफारस समितीने केली आहे.
ब्रह्मकुमारी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक मेहता यांनी याबाबत सांगितले की, आमच्या रुग्णालयावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. मंदार वेलणकर यांच्या मृत्यूस ब्रह्मकुमारी हॉस्पिटल जबाबदार नाही. जाणूनबुजून आमच्या हॉस्पिटलला त्रास देण्याचा हा प्रकार आहे. आमदार भारती लव्हेकर यांच्या समितीसमोर झालेल्या सुनावणीवेळी आम्ही आमची बाजू मांडली असून त्यांना सर्व कागदपत्रे दिली. मंदार वेलणकर यांच्यावर शस्त्रक्रिया ही डॉ. शशांक जोशी यांनी केली. आम्ही फक्त आमचे हॉस्पिटल व सेवा दिली. शवविच्छेदनात त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्टपणे नमूद केले आहे. मग आमचे हॉस्पिटल त्यांच्या मृत्यूस जबाबदार कसे, असा सवाल त्यांनी केला.
मीनाक्षी वेलणकर यांच्या तक्रारीच्या आधारे या हॉस्पिटलकडे नर्सिंग होम नोंदणी प्रमाणपत्र नसताना एखाद्या रुग्णाची शस्त्रक्रिया करणे हे अक्षम्य असून दिवंगत मंदार वेलणकर यांच्यावर कोणत्या आधारावर सदर हॉस्पिटलने शस्त्रक्रिया केली. बेकायदा शस्त्रक्रिया केल्या जातात; त्याला या हॉस्पिटलमधील संचालक व वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक मेहता यांची मान्यता असते, असे समितीला आढळून आले आहे. तसेच सदर हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जिकल शस्त्रक्रिया करता येत नाही, असा फलक लावला असताना कोणत्या आधारावर डॉ. जोशी यांनी मंदार यांच्यावर शस्त्रक्रिया केली.
डॉक्टरांच्या व हॉस्पिटलच्या चुकीच्या उपचारांमुळे पती मंदारचा मृृृत्यू झाल्याने त्यांच्या पत्नी मीनाक्षी २० महिन्यांपासून लढा देत आहेत. त्यांना अद्यापही राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून कुठलाही न्याय मिळालेला नाही. मंदार वेलणकर यांच्यावर केलेले उपचार व शस्त्रक्रिया बेकायदेशीर असून त्यांच्या मृत्यूस हॉस्पिटल व डॉ. अशोक मेहता व डॉ. शशांक जोशी हे जबाबदार असल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे.