लोकल प्रवासातही नेटवर्क ‘ऑन’; मध्य रेल्वेच्या ३,४६५ डब्यात वायफाय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 05:58 AM2021-12-20T05:58:32+5:302021-12-20T06:00:51+5:30
गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला वायफाय प्रकल्प नवीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: लोकलमध्ये नेटवर्कच्या अडचणींमुळे प्रवाशांची अनेक कामे खोळंबतात. मात्र, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला वायफाय प्रकल्प नवीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात प्रवाशांना लोकलमध्ये मोफत वायफाय सेवा मिळणार आहे.
एसटी महामंडळाच्या धर्तीवर मुंबईच्या लोकलमध्ये ‘प्री-लोडेड’ इंटरनेट सेवा देण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी मध्य रेल्वेकडून करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि कोरोनामुळे हा प्रकल्प रखडला आहे. रेल्वेने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता कंबर कसली असून नव्या वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. एका खासगी कंपनीमार्फत मध्य रेल्वेच्या १६५ लोकलमधील तीन हजार ४६५ डब्यात वायफाय लावण्याचे काम सुरू आहे.
‘कंटेट ऑफ डिमांड’अंतर्गत लोकलमध्ये बसवण्यात येणाऱ्या वायफाय सुविधेमध्ये प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाण्यांचा समावेश असेल. प्रवाशांना केवळ मोबाइल वायफाय सुरू करणे आवश्यक आहे. वायफाय लॉगइन केल्यानंतर प्रवाशांना ‘प्री-लोडेड’ माहिती मोबाइलवर पाहायला मिळेल.
- १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस आणि १४ दिवस पूर्ण झालेल्यांना प्रवासाची मुभा दिल्यानंतर प्रवासी संख्येत हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली. मात्र, जूनमध्ये पहिला डोस घेतलेल्यांचा दुसरा डोस पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे फारशी गर्दी नव्हती. मात्र, ही गर्दी सप्टेंबर-ऑक्टोबर पासून वाढली.
- डिसेंबरमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेची प्रवासी संख्या ६४ लाखापर्यंत गेली आहे. कोरोनापूर्व काळात दररोज सरासरी ८० लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करत होते.
- दरम्यान, हा आकडा आता ६४ लाखवर पोहचला असून ही संख्या कोरोना पूर्व काळाच्या ८० टक्के आहे. कोरोना प्रादुर्भाव झाल्यानंतर मार्च २०२० पासून उपनगरीय सेवा पूर्णपणे बंद केल्या होत्या.
- कोरोनापूर्व काळाच्या ८० टक्के लोक प्रवास करत आहेत. तर केवळ २० टक्के प्रवासी बाकी आहेत.
- कोरोनापूर्व काळात मध्य रेल्वे मार्गावरून दररोज सरासरी ४५ लाख जण प्रवास करत होते. १३ डिसेंबर रोजी ३६. २२ लाख प्रवाशांनी प्रवास केला. तर, पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज ३५ लाख जण प्रवास करत होते.
- १३ डिसेंबर रोजी २८ लाख प्रवाशांनी प्रवास केला. तसेच वातानुकूलित लोकलचीही प्रवासी संख्या वाढत असून पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमधून १ ते १४ डिसेंबर दरम्यान एक लाखाहून अधिक जणांनी प्रवास केला आहे.
मुंबई महानगरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी लसीकरण केलेले नाही. त्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. सरकारने प्राधान्याने त्यांचे लसीकरण करायला हवे. - मधू कोटियन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष