पेण : धरमतर खाडीत होऊ घातलेल्या धरमतर जेट्टी विस्तार प्रकल्पाची जनसुनावणी निर्विघ्नपणे पार पडली खरी परंतु जेट्टी रुंदीकरणातील पहिल्या टप्प्यातील खाडीची खोदाई करण्यासाठी मसद ग्रा.पं. हद्दीत आलेल्या जेएसडब्ल्यू शिपिंग ड्रेझरला १०० ग्रामस्थांनी विरोध केला. ग्रामस्थांनी यांत्रिक बोटीद्वारे खाडीत जाऊन ड्रेझरच्या कर्मचाऱ्यांना हटवले. जोपर्यंत धरमतर खाडीचा जॉर्इंट सर्व्हे होत नाही तोपर्यंत काम न करण्यासाठी आंदोलन केले. त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीचा धरमतर जेट्टी विस्तार प्रकल्पास विघ्न उद्भवले असून यापुढे १७५० मीटरपर्यंत अनेक अडथळा पार करावा लागण्याची शक्यता आहे.सज्जन जिंदाल समूहाचा डोलवी-पेण येथील लोह उत्पादन प्रकल्पाचा विस्तार व त्या अनुषंगाने धरमतर जेट्टीचा विस्तार मालवाहतुक, साठवण व आयात-निर्यातीसाठी केला जाणार आहे. प्रकल्पाच्या विस्तारास व जेट्टीच्या विस्तारास स्थानिकांनी पाठींबा दर्शविला खरा, पण विकासाच्या नावाखाली प्रकल्पबाधित चिरडला जाण्याची शक्यता आहे. कंपनी प्रशासनाने खाडीची खोदाई ग्रामपंचायतीना पूर्वसूचना न देता केली. गेले दहा दिवस शिपिंग ड्रेझर धरमतर खाडीमध्ये खोदाईचे काम करित आहे. जेव्हा हे शिपिंग ड्रेझर मसद ग्रा.पं. हद्दीत आले तेव्हा याबाबतची परवानगी व खाडी खोदाईच्या कामाची माहिती मिळावी म्हणून ग्रा.पं. सभासदांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले. सतत चार पाच दिवस याबाबत सरपंच व सदस्यांनी ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या व मच्छीमारांच्या तक्रारीची दखल घेवुन कंपनी प्रशासनास बैठकीस आमंत्रित केले. मात्र आजची ११.०० वाजेपर्यंतची वेळ टळुन गेल्यावर शंभरहुन अधिक महिला व पुरुष ग्रामस्थांनी यांत्रिक बोटी सज्ज करुन धरमतर खाडीतील ड्रेझर हल्लाबोल करुन ड्रेझरला कंपनीच्या जेट्टीकडे नेण्यास भाग पाडले. कंपनी प्रशासनाला यांची माहिती मिळताच कंपनीचे मॅनेजर अरुण शिर्के, जेट्टीच मॅनेजर एडवर्ड व कुमार थत्ते यांनी ग्रामस्थांबरोबर खाडीकिनारी तातडीची बैठक घेतली. बैठकीमध्ये ग्रामस्थांनी मागणी केलेल्या धरमतर खाडीचा १३५ मीटरचा मध्य पट्टा निश्चित करावा. मसद खाडीकिनाऱ्यापासुन १६५ मीटर लांब असणाऱ्या पट्टयाने खोदाईची लेआऊट करावी. ड्रेझरने खोदकाम केलेले मटेरियल खारभुमी बंधाऱ्यावर अथवा फुटलेल्या भुईकोठ्यावर टाकावे, ग्रामस्थ व अधिकारी यांनी धरमतर खाडीच्या वाहतूक चॅनेलचा जॉईट सर्व्हे करुन मार्कींग करावे, खाडीच्या खोदाईचे मेरी टाईम बोर्डाचे परवानगी पत्र ग्रा.पं. ला द्यावे.पर्यावरण व प्रदूषण मंडळाच्या परवानगीचे पत्र द्यावे. ओहोटीच्या पाण्याच्या पातळीपासुन खाडीची खोली किती खोदणार यांची माहिती व एस्टीमेट द्यावे, तसेच मासेमारी पट्यात ड्रेझरने खोदलेली रेती, माती, दगड टाकता कामा नये, भविष्यात खारभुमी बंधारे फुटले तर ते बांधणे कंपनीला बंधनकारक, मच्छीमाराची तुटणारी जाळी यांची भरपाई मिळावी या सर्व बाबींची पूर्तता करण्याचे कंपनी अधिकारी शिर्के यांना सांगितले.
धरमतर जेट्टी विस्तारात विघ्ने
By admin | Published: June 15, 2014 12:17 AM